तिरुवनंतपुरम–अजमेर साप्ताहिक विशेष ट्रेनला सिंधुदुर्गातील सावंतवाडी, कणकवलीसह प्रमुख स्थानकांवर थांबा
सिंधुदुर्ग,दि.२५ सप्टेंबर
दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ट्रेन क्रमांक 06013/06014 तिरुवनंतपुरम सेंट्रल–मदार जंक्शन–तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहे.
ट्रेन क्रमांक 06013 तिरुवनंतपुरम सेंट्रल–मदार जंक्शन ही विशेष ट्रेन बुधवार, 21 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर, 4, 11, 18 आणि 25 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 7.45 वाजता तिरुवनंतपुरम येथून सुटणार आहे. ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता मदार जंक्शन येथे पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक 06014 मदार जंक्शन–तिरुवनंतपुरम सेंट्रल ही विशेष ट्रेन शनिवार, 24 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर, 7, 14, 21 आणि 28 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 9.40 वाजता मदार जंक्शन येथून सुटणार असून चौथ्या दिवशी मध्यरात्री 12.45 वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे पोहोचणार आहे.
या विशेष ट्रेनला मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड यांसह कोकण रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवानंतर दिवाळीच्या काळात कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना या विशेष सेवेचा लाभ होणार आहे.
या गाडीला एकूण 20 LHB डबे असणार असून त्यामध्ये 1 द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 13 थ्री-टियर एसी इकॉनॉमी आणि 2 जनरेटर कारचा समावेश आहे.
या विशेष गाडीचे सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.