आमदार रविंद्र फाटक यांचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी ; तात्काळ ठाणे देवगड बससेवा सुरु करण्याचे मंत्र्यांचे आदेश
सिंधुदुर्ग ,दि.२९ जून
ठाणे ते देवगड या मार्गावर नवीन एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी विधानपरिषद सदस्य आमदार रविंद्र फाटक यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यावर तात्काळ ठाणे देवगड बससेवा सुरु करण्याचे आदेश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.
आ. रविंद्र फाटक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ठाणे–देवगड मार्गावर विद्यार्थी, नोकरी-व्यवसाय करणारे तसेच कोकणात ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, या मार्गावर थेट ठाणे ते देवगड एसटी बस सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठाणे ते देवगड थेट एसटी बस सेवा सुरू केल्यास नागरिकांचा वेळ आणि प्रवास खर्चाची बचत होईल. तसेच सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होऊन कोकणातील नागरिकांना मोठा लाभ मिळेल.नागरिकांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून ठाणे–देवगड नवीन एसटी बस सेवा तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी आ. रविंद्र फाटक यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.
त्यावर मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला तातडीने एसटी बस सोडण्याचे आदेश दिल्यामुळे ब-याच वर्षाची ठाणे ते देवगड एसची बसची मागणी पूर्ण होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.