Sindhudurg : शिक्षणाच्या हक्कासाठी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलनात ठाकरे शिवसेनेचे नेते सहभागी

शेअर करा

माजी खा. विनायक राऊत, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, गणेश गावकर, किरण टेंबुलकर यांनी दर्शवला पाठिंबा

सिंधुदुर्ग,दि.०७ ऑक्टोंबर

शिक्षणाच्या हक्कासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला माजी खा. विनायक राऊत, कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, तालुकाप्रमुख गणेश गावकर ,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला आहे. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार असून, कमी पटसंख्या किंवा इतर कोणतेही कारण देऊन गावातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ नये, अशी प्रमुख मागणी केली आहे.


या आंदोलनाचे नेतृत्व संजय वेतुरेकर आणि सिद्धार्थ जगदेव, बाळू मेस्त्री ,संपत देसाई आदींसह शिक्षण क्षेत्रातील नेते करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले आहेत.
प्राथमिक शाळा गाव, वाडी व वस्त्यांमधील कायम ठेवाव्यात, एका शाळेत एकच विद्यार्थी असला तरी त्या ठिकाणी शाळा सुरू ठेवावी आणि प्रत्येक वर्गासाठी व विषयासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून द्यावा. गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम करणारे शासन निर्णय मागे घेऊन शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करावी, शाळा व महाविद्यालयांमधील रिक्त शिक्षक पदे भरावीत, तसेच केजी ते पीजीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशा विविध मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.
शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण रोखून सर्वसामान्य, ग्रामीण, कष्टकरी आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना समान शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी माजी खा. विनायक राऊत यांनी केली आहे.

शेअर करा