जिल्ह्यातील ६३९ शेतकरी आधार प्रमाणीकरणासाठी पात्र
सिंधुदुर्ग,दि.११ सप्टेंबर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत राज्यातील ३.५५ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी शासनामार्फत आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ६३९ पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांशी संबंधित २२४ शेतकरी, तर राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांकडील ४१५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था कार्यालये, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सिंधुदुर्ग कार्यालय तसेच तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय पात्र लाभार्थ्यांची माहिती संबंधित विकास संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, संबंधित बँक शाखा, ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय येथे प्रसिद्ध करण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत सुरू आहे. उर्वरित पात्र कर्जदारांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी पुढील १५ दिवसांत टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
या योजनेअंतर्गत कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी यादीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या ‘आपले सरकार’ केंद्र अथवा महा ई-सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, कर्ज खात्याचे पासबुक तसेच बचत खात्याचे पासबुक सोबत घेऊन जावे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, पात्र लाभार्थ्यांनी कोणत्याही केंद्रावर आधार प्रमाणीकरणासाठी कोणतीही रक्कम देऊ नये, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी केले आहे.