सिंधुदुर्ग : जिल्हा परिषदेत 180 युवक-युवतींना कार्य प्रशिक्षणाची संधी

शेअर करा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून 11 महिन्यांचे प्रशिक्षण;
20 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा

सिंधुदुर्ग ,दि.११ ऑगस्ट 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामध्ये जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींना 11 महिन्यांसाठी कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी एकूण 180 कुशल व अर्धकुशल कार्य प्रशिक्षणार्थी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र युवक-युवतींनी या रोजगाराभिमुख संधीचा लाभ घेण्यासाठी 20 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रशिक्षण संधीमध्ये उपशिक्षक/पदवीधर शिक्षक (मराठी माध्यम) 139, उपशिक्षक/पदवीधर शिक्षक (उर्दू माध्यम) 6, डेटा एन्ट्री ऑपरेटर कम क्लार्क 18 आणि बहुउद्देशीय कर्मचारी 17, अशा एकूण 180 जागांचा समावेश आहे.

तालुकानिहाय विचार करता देवगड 23, दोडामार्ग 11, कुडाळ 23, कणकवली 23, मालवण 23, सावंतवाडी 26, वैभववाडी 12 आणि वेंगुर्ला 20 प्रशिक्षणार्थींची आवश्यकता आहे. तसेच जिल्हा परिषद मुख्यालयासाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर कम क्लार्क 10 आणि बहुउद्देशीय कर्मचारी 9 अशा एकूण 19 प्रशिक्षण संधी उपलब्ध आहेत.

उपशिक्षक/पदवीधर शिक्षक (मराठी माध्यम) पदासाठी 12 वी, डी.एड. पदविका/पदवी तसेच बी. एड. पदवी मराठी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उर्दू माध्यमातील पदासाठी 12 वी, डी. एड. पदविका/पदवी तसेच बी. एड. पदवी उर्दू माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

डेटा एन्ट्री ऑपरेटर कम क्लार्क पदासाठी 12 वी अथवा पदवी उत्तीर्ण, एम. एस. सीआयटी किंवा तत्सम प्रमाणपत्र तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे 30 किंवा 40 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बहुउद्देशीय कर्मचारी पदासाठी 12 वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक अर्हता आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 व कमाल 35 वर्षे असणे आवश्यक आहे.
इच्छुक व पात्र युवक-युवतींनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या www.cmykpy.mahaswayam.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून उपलब्ध प्रशिक्षण संधीसाठी अर्ज दिनांक 20 ऑगस्ट 2026 पर्यंत करावा.

जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी शासकीय आस्थापनेत कार्यानुभव मिळवून रोजगारक्षमतेला चालना देणाऱ्या या संधीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष आणि शिक्षण व आरोग्य समिती सभापती यांनी केले आहे.

शेअर करा