स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केली कारवाई ; दुचाकी चोरीप्रकरणी आरोपीला अटक
कणकवली, दि.०९ जुलै
शहरातून चोरीला गेलेली मोटारसायकल अवघ्या दोन तासांत शोधून काढत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वर्धा जिल्ह्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत चोरीस गेलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या कारवाईबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत वृत्त असे की, कणकवली शहरातील पाध्ये मेडिकलमध्ये सेल्समन म्हणून कार्यरत असलेले महेश भगवान बाईत (रा. पारकर चाळ, विद्यानगर, कणकवली) यांनी ८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास त्यांची होंडा ड्रीम युगा (क्रमांक एमएच ०७ एएल ३२४३ ) मोटारसायकल पाध्ये मेडिकलसमोरील मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाण पुलाखालील मोकळ्या जागेत उभी करून ते कामावर गेले होते. दुपारी २ वा च्या. सुमारास जेवणासाठी घरी जाण्यासाठी आले असता मोटारसायकल जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात तसेच कणकवली शहरात शोध घेऊनही मोटारसायकल न मिळाल्याने त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा समांतर तपास करताना सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे सिंधुदुर्ग गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सुनील जनार्दन दारोडे (वय ४०, रा. जामिनी, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) याचा शोध घेतला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत नरडवे नाका येथील बसस्टॉप शेडमधून त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली होंडा ड्रीम युगा मोटारसायकल जप्त करण्यात आली असून वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कार्यवाहीसाठी त्याला कणकवली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हवालदार प्रकाश कदम, जॅकसन घोन्साल्विस आणि डॉमिनिक डिसोझा यांच्या पथकाने केली.