कणकवलीत मोकाट गुरे, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणार – संदेश पारकर

शेअर करा

गोपुरी येथे कोंडवाडा व शेल्टर उभारणार;कुत्रे पकडून त्यांच्या निर्बीजीकरणाची व्यापक मोहीम

कणकवली,दि. २० ऑगस्ट

शहरातील मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता कणकवली नगरपंचायतीने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम सुरू असून, लवकरच कुत्रे पकडून त्यांच्या निर्बीजीकरणाची व्यापक मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.

कणकवली येथील गोपुरी आश्रम येथे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, लुकेश कांबळे, जयेश धुमाळे, गोपुरी आश्रमचे अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, सचिव बाळू मेस्त्री, खजिनदार विनायक सापळे, तेजस राणे, रामदास मांजरेकर आदी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान कोंडवाड्यासाठी आवश्यक असलेल्या जागेची पाहणी नगराध्यक्ष पारकर यांनी सहकाऱ्यांसमवेत केली. मोकाट गुरांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, त्यांच्या बंदोबस्तासाठी नगरपंचायतीकडून कोंडवाडा उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र शेल्टर उभारण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी गोपुरी आश्रम परिसरातील जागा उपलब्ध करून देण्याबाबत नगरपंचायतीने आश्रम व्यवस्थापनाशी चर्चा केली. अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, सचिव बाळू मेस्त्री आणि खजिनदार विनायक सापळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जागा उपलब्ध करून देण्यास संमती दर्शविली. आश्रम परिसरात दोन जागा दाखविण्यात आल्या असून, त्यापैकी योग्य जागेची निवड करून मोकाट गुरांसाठी कोंडवाडा आणि भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारण्याचे नियोजन आहे.

याबाबत नगरपंचायतीकडून लवकरच गोपुरी आश्रम व्यवस्थापनाशी अधिकृत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तसेच आगामी नगरपंचायत सभेच्या विषयपत्रिकेत हा विषय ठेवण्यात आला असून, कोंडवाडा व शेल्टरचे व्यवस्थापन, आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच मोकाट गुरे सोडणाऱ्या संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

लवकरच ठराव, अंदाजपत्रक आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून कोंडवाडा तसेच भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल. कणकवली शहरातील नागरिकांना मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी ही कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा नगरपंचायतीचा प्रयत्न असल्याचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी स्पष्ट केले.

शेअर करा