तळेरे : कृतज्ञतेची राखी सीमेवरील जवानांसाठी

शेअर करा

रक्षाबंधनाच्या निमित्ताने वामनराव महाडिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा हृदयस्पर्शी उपक्रम

तळेरे,दि.२३ ऑगस्ट

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम,विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक असलेला पवित्र सण आहे.या प्रेमाच्या नात्याला राष्ट्रप्रेमाची जोड देत देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती प्रेम,आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे येथील विद्यार्थ्यांनी ‘कृतज्ञतेची एक राखी सीमेवरच्या जवानांसाठी’ हा हृदयस्पर्शी उपक्रम राबविला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने विविध रंगांचे व सजावटीचे साहित्य वापरून सुंदर राख्या तयार केल्या.या राख्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना पाठविण्यात आल्या. प्रत्येक राखीत जवानांविषयीचा आदर,प्रेम,कृतज्ञता आणि देशभक्तीची भावना गुंफलेली होती.
देशाच्या सुरक्षेसाठी कुटुंबापासून दूर राहून सण-उत्सवांचाही त्याग करणाऱ्या जवानांच्या कर्तव्यनिष्ठेची व त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना दृढ व्हावी,हा या उपक्रमाचा उद्देश होता.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम व जवानांविषयी आदराची भावना अधिक दृढ झाली.या उपक्रमासाठी परळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर,विद्यालयाचे अध्यक्ष अरविंद महाडिक,सर्व शाळा समिती सदस्य, प्राचार्य अविनाश मांजरेकर,प्राध्या.सचिन शेटये , प्रा.अन्वी गवाणकर तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.

शेअर करा