तळेरे : आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सेरेना म्हसकरचा अक्षरोत्सव परिवाराकडून गौरव

शेअर करा

भारतीय संघातील दमदार कामगिरीची दखल; अभिनंदन पत्राची फ्रेम व शाल देऊन सन्मान

तळेरे,दि.१९ सप्टेंबर

बहरीन येथे झालेल्या आशियाई कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू कु. सेरेना मेघाली सचिन म्हसकर हिचा अक्षरोत्सव परिवाराच्या वतीने नांदगाव येथे विशेष सन्मान करण्यात आला. भारतीय संघातील निवड आणि सुवर्णपदकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला अभिनंदन पत्राची आकर्षक फ्रेम आणि शाल देऊन गौरविण्यात आले.

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सेरेनाने अल्पवयातच कबड्डी क्षेत्रात सातत्यपूर्ण यश संपादन केले आहे. १४ वर्षांखालील राष्ट्रीय शालेय स्पर्धेत कांस्यपदक मिळविल्यानंतर तिने १८ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. तसेच १७ वर्षांखालील राष्ट्रीय शालेय स्पर्धा, किशोरी गट आणि कुमारी (ज्युनियर) गटातील राष्ट्रीय स्पर्धांसाठी महाराष्ट्र संघात तिची निवड झाली होती. या यशस्वी वाटचालीचा पुढचा टप्पा म्हणून तिने आशियाई स्पर्धेत भारतीय संघातून खेळत सुवर्णपदकाची कामगिरी नोंदविली.

सन्मान सोहळ्यावेळी अक्षरोत्सव प्रमुख निकेत पावसकर यांनी सेरेनाचे अभिनंदन करताना तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “सेरेनाने आशियाई स्पर्धेत केलेली कामगिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. तिच्या खेळातील सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ती भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी मोठी भरारी घेईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सेरेना ही आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू मेघाली कोरगावकर-म्हसकर आणि आंतरराष्ट्रीय रग्बी व कबड्डीपटू सचिन म्हसकर यांची कन्या असून, तिच्या यशामुळे क्रीडा क्षेत्रात नांदगावसह संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

शेअर करा