तळेरे : शिरवलीत चाकरमान्यांच्या सोयीसाठी आकर्षक दिशादर्शक फलक

शेअर करा

गवाणे शाळा चौकात सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ मेस्त्री यांच्या संकल्पनेतून एलईडी दिशादर्शक फलक उभारले

तळेरे,दि.१२ सप्टेंबर

गणेशोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढत असताना त्यांना विविध वाड्यांपर्यंत सहजपणे पोहोचता यावे, यासाठी शिरवली येथे आकर्षक दिशादर्शक फलक उभारण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ मेस्त्री यांच्या संकल्पनेतून गवाणे शाळा चौकात हे दिशादर्शक एलईडी फलक बसविण्यात आले.

“माझे गाव… माझा अभिमान…” असा संदेश देणाऱ्या या फलकांवर शिरवली, काजरवाडी, गव्हाणे, नाद, वाघिवरे आणि जोंधळ या परिसरातील वाड्यांच्या दिशांचे स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रथमच गावात येणाऱ्या पाहुण्यांना तसेच गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना योग्य मार्ग शोधणे अधिक सुलभ होणार आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा अपरिचित व्यक्तींना गावातील विविध वाड्यांपर्यंत पोहोचताना होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या दिशादर्शक फलकांमुळे प्रवाशांना निश्चित स्थळी सुरक्षित आणि वेळेत पोहोचणे शक्य होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या प्रसंगी काशिनाथ मेस्त्री, सागर मेस्त्री, मयूर गोरुले, विजय दसुरे, अनिल तेली, दीपेश मेस्त्री, विठोबा तेली तसेच मित्र परिवार उपस्थित होता. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा सामाजिकदृष्ट्या उपयुक्त कामांमुळे गावाची ओळख अधिक ठळक होत असल्याचे सांगितले.

गणेशोत्सवाच्या काळात हजारो चाकरमानी कोकणातील आपल्या मूळ गावी परततात. अनेकदा नवीन पाहुणे किंवा बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना गावातील वाड्यांचा मार्ग शोधताना अडचणी येतात. शिरवली येथे उभारण्यात आलेले दिशादर्शक फलक ही समस्या दूर करण्यास मदत करणार असून ग्रामस्थांच्या सहकार्याने साकारलेला हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

शेअर करा