तळेरे,दि.११ सप्टेंबर
एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने देऊलकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना अवांतर वाचनासाठी कथा, कादंबऱ्या, मनोरंजन, विज्ञान कथा, काल्पनिक कथा तसेच ऐतिहासिक कथांच्या पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. सध्याच्या मोबाईलच्या दुनियेत, कमी होत चाललेली वाचन संस्कृतीची सवय मुलांना बालवयापासून लागावी; हा मुख्य हेतू ह्या पुस्तके भेट देण्यामागे आहे. ह्या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई प्रमुख पाहूणे होते.
यावेळी बोलताना संजय देसाई यांनी ट्रस्टच्या कामांचे कौतुक करताना, सिंधुदुर्ग जिल्हा व बहुतांशी कणकवली तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्ट करीत असलेल्या भरीव मदतीबद्दल सर्व शिक्षक, पालक व विध्यार्थ्यांच्या वतीने ट्रस्टचे आभार मानले. आपल्या छोटेखानी भाषणात श्री संजय देसाई यांनी, शाळेतील शिक्षक, विध्यार्थी तसेच उपस्थित असलेल्या पालकांना वाचनाचे महत्व सांगितले व सर्वांना येणाऱ्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना. पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री गोसावी यांनी ह्या कार्यक्रमाचे महत्व विषद केले. ह्या प्रसंगी एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त श्री बी एस सावंत यांनी आपल्या संदेशात मुलांना शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त, अवांतर वाचनाचे महत्व अधोरेखित केले. कार्यक्रमास कासार्डे गावाचे उपसरपंच गणेश पाताडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश तिर्लोटकर, माजी ग्रामपंचायत सदस्य अतुल सावंत, गावातील प्रतिष्ठित मंडळी आणि शाळेतील शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते. सूत्र संचालन श्री. कुडतरकर यांनी केले.