Talere : बुरंबावडे ग्रामविकास मंडळाचा पुढाकार; धाकट्या तळ्यावर वनराई बंधारा

शेअर करा

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांचे श्रमदान; पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रमाला चालना

तळेरे,दि.१४ ऑक्टोंबर
पावसाच्या दुर्भिक्षामुळे सर्वत्र भविष्यातील पाण्याच्या व्यवस्थापनेचा प्रश्न पावसाळ्याचे दिवस संपण्यापूर्वीपासूनच मोठ्या चिंतेचा विषय झालेला आहे. या पार्श्वस्थितीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, देवगड तालुक्यातील बुरंबावडे येथील बुरंबावडे ग्रामविकास मंडळाने एका सभेत पाणी अडवून जिरवण्याचा निर्णय घेऊन गावातील धाकटे तळे येथे पाणी अडवून जिरवण्यासाठी वनराई बंधारा बांधण्याचे ठरवले आणि त्यानुसार मंडळाच्या वतीने ग्रामस्थांच्या सहयोगातून वनराई बंधारा बांधण्यात आला. 

 पन्नास वर्षांपूर्वी या ठिकाणी बाराही महिने विपुल पाणी असायचे. पाण्यात कमळे फुललेली असायची. बाराही महिने म्हैशी, रेडे शरीरातील तापमान कमी करण्यासाठी शितलतेसाठी सदर तळ्यात तासंतास डुंबून बसायचे. गुरे-ढोरे, पक्षी यांना हे तळे पाण्यासाठी आश्रयस्थान होते. अलीकडच्या पर्यावरणाच्या असंतुलनाने पाण्याचा हा बारमाही साठा कमी होत जाऊन पावसाळ्यानंतर तीन महिन्यांनी पाणवठ्याची ही जागा कोरडी पडत गेली. नुकत्याच बांधण्यात आलेल्या या वनराई बंधाऱ्यामुळे येथील कोरड पडलेल्या पाण्याची पातळी एक पुरुष इतकी उंच होऊन वाहत

आहे. बऱ्यापैकी पाणी अडवून जिरवले जात आहे. त्याचा उपयोग तळ्याचे झरे ओले राहुन जिवंत राहण्यासाठी तसेच गुरे व पक्षी यांना पाणी उपलब्ध राहण्यासाठी होणार आहे.

शेअर करा