पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे दिलीप तळेकर यांची मागणी; बीओटी तत्त्वावरील विकासाचा निर्णय रद्द करण्याची निवेदनातून मागणी
तळेरे,दि.२३ सप्टेंबर
तळेरे बसस्थानकाचा प्रस्तावित बीओटी तत्त्वावरील विकास रद्द करून एस.टी. महामंडळाच्या निधीतूनच आधुनिक बसस्थानक उभारावे, अशी मागणी कणकवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अनेक गावांसाठी तळेरे बसस्थानक हे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. येथून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी एस.टी. बससेवेचा लाभ घेतात. त्यामुळे भविष्यातील वाढती लोकसंख्या, वाढणारी वाहतूक तसेच आसपासच्या गावांमधून येणाऱ्या प्रवाशांचा विचार करता तळेरे येथे आधुनिक आणि सर्व सुविधांनीयुक्त बसस्थानक उभारणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सन २०२५ मध्ये तळेरे बसस्थानकाचा सीआयडीसीओ तत्त्वावर खासगी विकासकाच्या माध्यमातून विकास करण्यास शासनस्तरावर मंजुरी देण्यात आली होती. मात्र, या निर्णयाबाबत तळेरे ग्रामस्थांमध्ये नाराजी असून बसस्थानकाची सार्वजनिक जागा खासगी विकासासाठी देण्यास विरोध असल्याचे दिलीप तळेकर यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे.
बसस्थानकाचा विकास हा प्रवाशांच्या मूलभूत सुविधांशी तसेच सार्वजनिक हिताशी संबंधित विषय आहे. त्यामुळे बसस्थानकाचा विकास खासगी विकासकाच्या माध्यमातून न करता एस.टी. महामंडळाने स्वतःच्या निधीतून करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तळेरे परिसराचा भविष्यातील विकास, वाढणारी लोकसंख्या, वाढती वाहतूक आणि आसपासच्या गावांमधून येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता आधुनिक बसस्थानकाची गरज अधिक तीव्र झाली आहे. सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या तळेरे बसस्थानकाच्या विकासामध्ये सर्वसामान्य प्रवाशांच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बीओटीचा निर्णय रद्द करण्याची मागणी:-
या पार्श्वभूमीवर बीओटी तत्त्वावरील तळेरे बसस्थानक विकासाचा निर्णय रद्द करून एस.टी. महामंडळाच्या निधीतून नवीन बसस्थानक उभारण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी दिलीप तळेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे तळेरे बसस्थानकाच्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, या मागणीवर शासनस्तरावर कोणता निर्णय घेतला जातो याकडे तळेरेवासीयांचे लक्ष लागले आहे.