तळेरे ,दि.१३ ऑगस्ट
तळेरे बसस्थानकातील नादुरुस्त स्वच्छतागृहाच्या दुरावस्थेचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, सरपंच हनुमंत तळेकर यांच्या पुढाकाराने आणि प्रशासनाच्या सहकार्याने या सुविधेला नवसंजीवनी मिळाली आहे. प्रवाशांच्या गैरसोयीचा प्रश्न केवळ चर्चेत न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीतून सोडविण्याची भूमिका सरपंचांनी घेतली त्यामुळे हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे.
बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाल्याने प्रवाशांची, विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर सरपंच हनुमंत तळेकर यांनी संबंधित प्रशासनाशी समन्वय साधून दुरुस्तीचे काम मार्गी लावले. या कामासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था, पाणी साठवणुकीच्या टाक्या, टाईल्स तसेच अन्य आवश्यक साहित्य त्यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिले.
या उपक्रमाला राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाचे (कणकवली) विभागीय नियंत्रक दीपक घोडे व स्थापत्य अभियंता अक्षय केकरे यांनी सहकार्य केले. प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम करण्यात आले. ठेकेदार शिंदे यांनीही काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
या संपूर्ण प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी प्रशासकीय पातळीवर सातत्याने प्रयत्न केले. बसस्थानकावरील महिलांची गरज लक्षात घेऊन येथे स्वतंत्र ‘हिरकणी कक्ष’ सुरू करण्यात यावा, अशी मागणीही जाधव यांनी केली आहे.
सार्वजनिक सुविधेचा प्रश्न सुटल्याने तळेरे बसस्थानकातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्वच्छतागृहाची दुरुस्ती हा केवळ एका सुविधेचा प्रश्न नसून, सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांना सन्मानजनक मूलभूत सुविधा मिळाव्यात, या दृष्टिकोनातून झालेला महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे.