तळेरे : तळेरे ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान

शेअर करा

तळेरे बाजारपेठ, मच्छी मार्केट, उड्डाण पुलाखालील परिसर आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची स्वच्छता

तळेरे,दि.०५ जुन

तळेरे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत दि. ४ जून रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत गावातील विविध भागांत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व सरपंच हनुमंत तळेकर यांनी केले. यावेळी उपसरपंच संदीप घाडी, ग्रामपंचायत अधिकारी सौ. राजलक्ष्मी जाधव, आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. धनश्री जाधव, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

या मोहिमेत तळेरे बाजारपेठ, मच्छी मार्केट, उड्डाण पुलाखालील परिसर तसेच स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. परिसरातील कचरा, प्लास्टिक व इतर टाकाऊ वस्तू हटविण्यात आल्या.

स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने आवश्यक स्वच्छता साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते.

“आपले गाव, आपली जबाबदारी” हा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.

शेअर करा