तळेरे : डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी आरोग्यसेवा बंदला DFC चा पाठिंबा

शेअर करा

२० ते २१ जुलैदरम्यान बंद पाळण्याचे आवाहन; जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय शाखांतील डॉक्टरांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे डॉ. राजेंद्र पाताडे यांचे आवाहन

तळेरे,दि.१८ जुलै

डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), महाराष्ट्र यांनी सोमवार, दि. २० जुलै सकाळी ६.०० ते मंगळवार, दि. २१ जुलै सकाळी ६.०० या कालावधीत दिलेल्या राज्यव्यापी आरोग्यसेवा बंदच्या हाकेला डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब (DFC), सिंधुदुर्ग यांनी जाहीर पाठिंबा दिला असून, जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय शाखांतील डॉक्टरांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब (DFC) सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे केले आहे.

  या बंद दरम्यान बाह्यरुग्ण सेवा बंद राहील, तर आपत्कालीन सेवा व अतिदक्षता विभाग नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब ही सुमारे ४० वर्षांपासून कार्यरत असलेली ऍलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व दंतवैद्यकीय शाखांतील डॉक्टरांची मातृसंघटना असून, डॉक्टरांमधील एकता, सुरक्षितता, परस्पर सन्मान आणि गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे. डॉक्टरांवरील हल्ले हे संपूर्ण वैद्यकीय व्यवसायावरील हल्ले असून, सर्व वैद्यकीय शाखांनी या प्रश्नावर एकदिलाने उभे राहण्याची गरज असल्याचे डीएफसीने म्हटले आहे.
आयएमएचे आंदोलन हे प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाच्या सुरक्षितता व सन्मानासाठी असल्याची भूमिका डीएफसी ने स्पष्ट करत, MBBS, BAMS, BHMS, BUMS, Dental या सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय शाखांतील डॉक्टरांनी बंदमध्ये सहभागी होऊन एकजूट दाखवावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे व जिल्हा सचिव डॉ. सुहास पावसकर यांनी केले आहे.
डीएफसी च्या प्रमुख मागण्या :
▪️आरोपींवर जलदगतीने कठोर कायदेशीर कारवाई करावी.
▪️सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही व प्रभावी सुरक्षा व्यवस्था बंधनकारक करावी.
▪️रुग्णालयातील तोडफोडीची नुकसानभरपाई दोषींकडून वसूल करावी.
▪️डॉक्टर संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करून अधिक प्रभावी कायदेशीर संरक्षण द्यावे.
▪️सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकी व आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करावा.
▪️डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या प्रकरणात त्यांच्या तक्रारीची वाट न पाहता पोलिसांनी स्वतःहून (Suo Motu) गुन्हा दाखल करून तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी आदी मागण्या केल्या आहेत

 

शेअर करा