AI आधारित शिक्षण, डिजिटल परिवर्तन आणि शिक्षक प्रशिक्षणावर राष्ट्रीय स्तरावरील विचारमंथन
तळेरे,दि.२६ सप्टेंबर
शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील शिक्षणव्यवस्थेची प्रभावी सांगड घालण्यासाठी मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या वतीने ‘EDUCON 2026 – AI Education Summit & 6th National Education Conference’ या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आज रविवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे अध्यक्ष तथा तळेरे गावचे सुपुत्र प्रा. डॉ. विशाल कडणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शिक्षकांना AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करता यावा, तसेच बदलत्या शैक्षणिक गरजांशी सुसंगत अध्यापन पद्धती आत्मसात करता याव्यात, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर या परिषदेत सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील AI चे वाढते महत्त्व, शिक्षकांसाठी AI व आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, भविष्यातील शिक्षणपद्धती, डिजिटल परिवर्तन, नाविन्यपूर्ण अध्यापन तंत्र तसेच राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणविषयक विचारमंथन यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरवही यावेळी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महापौर रितू तावडे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे तसेच उपमहापौर संजय घाडी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विशाल कडणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांसाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
चौकट : ‘एज्युकॉन २०२६’ ची प्रमुख वैशिष्ट्ये
शिक्षण क्षेत्रातील AI च्या वापरावर मार्गदर्शन
शिक्षकांसाठी आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण
डिजिटल शिक्षण आणि भविष्यातील शिक्षणपद्धती
नाविन्यपूर्ण अध्यापन तंत्रांचा परिचय
राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणविषयक विचारमंथन
उल्लेखनीय शिक्षकांचा गौरव
शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांशी संवादाचे व्यासपीठ