तळेरे : संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मोफत सहाय्य शिबिर उत्साहात संपन्न

शेअर करा

तळेरे,दि.११ ऑगस्ट

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्यासाठी आवश्यक सहाय्य मिळावे व शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, या उद्देशाने तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर यांच्या पुढाकारातून दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी आरोग्य उपकेंद्र, तळेरे येथे मोफत सहाय्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास पंचायत समिती कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर तसेच तहसीलदार दीक्षांत देशपांडे, सरपंच हनुमंत तळेकर, माजी सरपंच शशांक तळेकर, ग्रामविकास अधिकारी सौ.राजलक्ष्मी जाधव, राजेश जाधव, उपकेंद्राच्या डॉ. सौ.जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मान्यवरांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
शिबिरामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्यासाठी मोफत सहाय्य, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व ऑनलाइन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आयुष्मान कार्ड, आभा कार्ड, वयोवंदना कार्ड यांसह विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, आरोग्य सेविका, ग्रामस्थ तसेच योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर अशा प्रकारचे लोकाभिमुख व सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
ग्रामपंचायत तळेरेच्या या उपक्रमामुळे निराधार व गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया अधिक सुलभ झाली असून, उपस्थित मान्यवर व सर्व संबंधितांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.

शेअर करा