तळेरे :राज्यातील निवडक १०० शाळांमध्ये गोवळ गावठण शाळेचा गौरव

शेअर करा

शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम व समाजसहभागाची दखल; ग्रामस्थांसाठी अभिमानाचा क्षण

तळेरे,दि.३० सप्टेंबर

महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (MIEPA), छत्रपती संभाजीनगर आणि NCSL-NIEPA, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय **‘शैक्षणिक यशोगाथा संग्रहा’त महाराष्ट्रातील निवडक १०० शाळांमध्ये देवगड तालुक्यातील जि. प. प्रा. पूर्ण शाळा, गोवळ गावठाण, केंद्र पाटगाव या शाळेचा गौरवपूर्ण समावेश करण्यात आला आहे. शाळेने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही राज्यस्तरीय पावती मानली जात आहे.

शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि समाजसहभाग या क्षेत्रांत शाळेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली आहे. शाळेच्या प्रेरणादायी शैक्षणिक प्रवासाची नोंद राज्यस्तरीय यशोगाथा संग्रहात झाल्याने गोवळ गावठाण व पाटगाव परिसराच्या शैक्षणिक लौकिकात भर पडली आहे.

या उल्लेखनीय यशामध्ये मुख्याध्यापक पंढरीनाथ गवळी, पदवीधर शिक्षिका श्रीमती स्नेहल राणे, श्रीमती रीना पाटील, तसेच शिक्षक भूषण बंडे व प्रशांत केंवळे यांचे विशेष योगदान राहिले आहे. पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी यांचेही सहकार्य लाभले.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुकाराम काळे, सरपंच श्रीमती दक्षता मेस्त्री, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालकवर्ग आणि गोवळ गावठाण व पाटगाव ग्रामस्थांच्या सक्रिय सहकार्यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, केंद्रप्रमुख लहू दहिफळे यांनी शाळेचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील जि. प. प्रा. पूर्ण शाळा, गोवळ गावठाण, केंद्र पाटगाव या शाळेने आपल्या गुणवत्तापूर्ण कार्याची राज्यस्तरावर नोंद करून घेतल्याने ही यशोगाथा महाराष्ट्रातील इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा