तळेरे : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून वहया, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्यांची होणारी बेकायदेशीर विक्री तात्काळ बंद करण्यात यावी

शेअर करा

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेंबुडकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी

तळेरे,दि. १० जून

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय व खाजगी प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमधून वहया, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्यांची होणारी बेकायदेशीर विक्री तात्काळ बंद करण्यात यावी. त्याचबरोबर अशाप्रकारे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांच्या माथी मारणाऱ्या शाळा व संस्थावरती तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेंबुडकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय व खाजगी प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमधून वहया, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्यात यावी अशाप्रकारचा तगादा जिल्ह्यातील काही शाळांमधून शाळा व संस्था चालकांकडून विद्यार्थ्यांना व पालकांना करण्यात येत असल्याच्या तक्रारी काही पालकांनी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संस्थेकडे करून या शैक्षणिक साहित्य खरेदीला चाप लावण्याची मागणी केली होती. ही गंभीर बाब लक्षात घेऊन संघटनेने तातडीने या विषयामध्ये लक्ष घातले. 

जिल्हयातील काही शासकीय शाळांमधून व काही खाजगी शाळांमधून बेकायदेशीररित्या वहया, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्यांची शालेय मुलांना विक्री होतांना दिसून येते. शैक्षणिक संस्था (शाळा, कॉलेज) बेकायदेशीरपणे आपल्या संस्थांमार्फत वहया, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्यांची राजरोसपणे विक्री करत आहेत. मुलांना व पालकांना जबरदस्तीने महाग दराने शैक्षणिक साहित्याची विक्री करत आहेत. शासकीय नियमानुसार अशा प्रकारे शैक्षणिक संस्थांनी दुकानदारी करणे ही बाब बेकायदेशीर असून आपण स्वतः यामध्ये लक्ष घालून सदरच्या संबंधित शाळांना प्रत्यक्ष भेट देवून समज द्यावी व आपल्या स्तरावर सर्व शाळा व कॉलेजना परिपत्रक काढून अशा प्रकारे होणारी विक्री तातडीने बंद करावी. अन्यथा अशा शाळांवरती कारवाई करण्यात यावी तसेच याबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत संघटनेला लेखी पत्राद्वारे माहिती देण्यात यावी अशाप्रकारची मागणी संघटनेने केली आहे.

शाळांमधून संस्थांच्या माध्यमातून चालणारी दुकानदारी बंद करण्यासाठी या प्रश्नी राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनेने तातडीने हालचाल करत शाळांमधून होणारी बेकायदेशीर शैक्षणिक साहित्य विक्री बंद करण्यासाठी पावले उचलली. प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य केवळ शाळेतूनच खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या खाजगी शाळांवर कारवाई करण्यात यावी अशाप्रकारे लेखी निवेदन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेंबुडकर तसेच उपमुख्यकार्यकारी अधिकारी तसेच प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी- जयप्रकाश परब, माध्यमिक शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी अपसरुद्दीन फारुकी तसेच जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावस्कर यांना देण्यात येऊन या प्रश्नावरती लक्ष वेधले. 

   यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा उपाध्यक्ष संजय शेळके, जिल्हा महिला संघटक सौ. मीनल पार्टे, कणकवली तालुका अध्यक्ष तथा स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्स कणकवलीचे संचालक मंगेश चव्हाण, पुस्तक विक्रेते संघटनेचे शुभम परब उपस्थित होते.

याबाबतच्या उचित कार्यवाहीसाठी माहितीसाठी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तसेच शालेय साहित्य विक्रेता संघटनेचे महाराष्ट्र राज्य संघटक मोहन पाटील यांना पाठविण्यात आली.

शेअर करा