तळेरे : काव्या तळेकरचे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचे यश

शेअर करा

जि.प.शिक्षण समितीच्या वतीने काव्याचा सत्कार

तळेरे,दि.१३ ऑगस्ट

पीएम श्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नंबर १ मधील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु. काव्या सदानंद तळेकर हिने शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या यशामुळे तळेरे परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

काव्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी शिक्षण समिती सभापती प्रितेश राऊळ तसेच जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य प्रमोद रावराणे यांच्या हस्ते काव्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

काव्या सध्या नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असल्याने तिला सत्कार समारंभास उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे तिच्या वतीने तिचे वडील सदानंद तळेकर यांनी हा सन्मान स्वीकारला.

यावेळी मुख्याध्यापक महेंद्र पावसकर, जि. प. सदस्या प्राची ईस्वलकर तसेच जिल्हा परिषदेचे अन्य सदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी काव्याच्या यशाचे कौतुक करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
काव्याने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शेअर करा