गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ मित्र मंडळाचा उपक्रम; प्लास्टिकला नकार, कापडी पिशवीचा स्वीकार
तळेरे,दि.११ सप्टेंबर
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने तळेरे बाजारपेठ गणेशोत्सवाच्या खरेदीने गजबजून गेली आहे. गणेशभक्त, ग्रामस्थ तसेच ग्राहक मोठ्या संख्येने बाजारपेठेत खरेदीसाठी येत आहेत. या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ स्वच्छ, सुंदर आणि आदर्श राहावी, तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी तळेरे बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
बाजारपेठेत ठिकठिकाणी ‘कचरा नियोजित ठिकाणीच टाका’ अशा आशयाचे सूचनाफलक लावण्यात आले आहेत. ग्राहक, ग्रामस्थ आणि व्यापारी यांनी कचरा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता नियोजित ठिकाणीच टाकावा, यासाठी या फलकांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने स्वच्छता राखण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
यासोबतच प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा पर्यावरणपूरक संदेशही या फलकांद्वारे देण्यात आला आहे. अनावश्यक प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी खरेदीसाठी येताना कापडी पिशवी सोबत आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
“गणरायाचे स्वागत करूया भक्तिभावाने, निसर्गाचे रक्षण करूया जबाबदारीने;” प्लास्टिक पिशवी एकदाच भारी पण कापडी पिशवी वारंवार भारी” असा संदेश देत तळेरे बाजारपेठ मित्र मंडळाने गणेशोत्सवाच्या आनंदासोबत स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
या उपक्रमाला ग्राहक, ग्रामस्थ आणि व्यापारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद देत बाजारपेठ स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.