अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने पुण्यात पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
तळेरे,दि.११ सप्टेंबर
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कराड आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले सभागृह, पुणे येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल खासदार रामराव वडकुते यांचा मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवडचे आमदार शंकरभाऊ जगताप होते. यावेळी रामहरी रुपनवर, ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांसह राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
अध्यक्षीय भाषणात आमदार शंकरभाऊ जगताप म्हणाले, “अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेचे प्रयत्न निश्चितच दिशादर्शक आहेत.”
राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल झालेल्या सत्काराला उत्तर देताना खासदार रामराव वडकुते यांनी, “या सन्मानामुळे अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहीन,” असे सांगितले.
यावेळी आमदार रामहरी रुपनवर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर होणे काळाची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉ. एम. एम. शिकारे, नगरसेवक नारायण गलांडे, डॉ. दिपाली सूर्यवंशी, डॉ. पंकज भिवटे, उद्योजक सुधीर वाघमोडे, सूर्यकांत गोफणे, मुकेश कारवा, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल कोळपे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग, कृषी व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १९ मान्यवरांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले. सूत्रसंचालन आकाश पाटील यांनी, तर आभार प्रा. महावीर काळे यांनी मानले.
“विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव”
सोहळ्यात कामगार भूषण, समाजभूषण, उद्योगरत्न, शिक्षणरत्न, कृषीरत्न, वैद्यरत्न, अहिल्या रत्न, समाजरत्न आदी पुरस्कारांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच आयपीएस पदासाठी निवड झालेल्या प्रवीण कोळपे यांचा विशेष गौरव करण्यात आला.