महिला व्यापारी संघटना व ग्रामपंचायतीचा संयुक्त उपक्रम
तळेरे,दि. १७ ऑगस्ट
महिलांना विविध प्रकारचे मोदक तयार करण्याचे कौशल्य अवगत व्हावे, पारंपरिक खाद्यपदार्थ निर्मितीला प्रोत्साहन मिळावे आणि या कौशल्याचा उपयोग घरगुती व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी करता यावा, या उद्देशाने महिला व्यापारी संघटना तळेरे व ग्रामपंचायत तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने, तळेरेचे सरपंच हनुमंत तळेकर यांच्या सहकार्याने ‘मोदक प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायत तळेरेच्या सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या प्रशिक्षणासाठी पूनम सुशील तळेकर यांनी मार्गदर्शक म्हणून महिलांना विविध प्रकारचे मोदक तयार करण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले. मोदक बनविण्याच्या विविध पद्धती आणि आवश्यक साहित्याचा वापर याबाबत त्यांनी प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष माहिती दिली. शिबिरासाठी आवश्यक साहित्य-सामग्री सरपंच हनुमंत तळेकर यांनी उपलब्ध करून दिली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी तळेरेचे उपसरपंच संदीप घाडी तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. रिया चव्हाण, सौ. प्राची चव्हाण व सौ. निलम वाडये उपस्थित होते.
कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटनेचे कार्यवाह तथा आदर्श व्यापारी संघटना तळेरेचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ राजू जठार, कार्याध्यक्ष अमोल सोरप, महिला व्यापारी संघटना कणकवलीच्या अध्यक्ष संजना काकडे आणि हॉटेल संघटना कणकवलीचे अध्यक्ष संतोष काकडे यांची उपस्थिती लाभली.
तसेच ग्रामपंचायत अधिकारी सौ. राजलक्ष्मी जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय तळेरेच्या सहायक शिक्षिका सौ.धनलक्ष्मी तळेकर, कासार्डे माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या सहायक शिक्षिका सौ.विधी मुद्राळे, ग्रामपंचायत कर्मचारी बाबू मेत्री आणि ग्रामस्थ सुशील तळेकर यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी चंद्रकांत ऊर्फ राजू जठार, संजना काकडे आणि ग्रामपंचायत अधिकारी राजलक्ष्मी जाधव यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला व्यापारी संघटना तळेरेच्या अध्यक्ष सौ. संपदा महाडीक व उपाध्यक्ष सौ. रेश्मा तळेकर यांनी केले. महिला व्यापारी संघटना तळेरे व ग्रामपंचायत तळेरे यांच्या संयुक्त आयोजनातून आणि सरपंच हनुमंत तळेकर यांच्या सहकार्याने झालेल्या या प्रशिक्षणाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.