तळेरे : नवलादेवी नाद ग्राम विकास मंडळाच्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

शेअर करा

प्रकाश बाणे प्रथम; प्रितेश नादकर द्वितीय, विनोद पांगम तृतीय

तळेरे,दि.२१ सप्टेंबर
श्री नवलादेवी नाद ग्राम विकास मंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२६ चा निकाल जाहीर करण्यात आला असून, ग्रामस्थांनी साकारलेल्या आकर्षक व कल्पक गणेश सजावटींचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धेत भोळेवाडी येथील प्रकाश बाणे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत एकूण 20 जणांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते.

पारंपरिकता, कलात्मकता, पर्यावरणपूरकता आणि नावीन्यपूर्ण संकल्पना यांचा विचार करून परीक्षकांनी विजेत्यांची निवड केली. स्पर्धेत भोळेवाडी येथील प्रकाश बाणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. गावठण येथील प्रितेश नादकर यांनी द्वितीय, तर गावठण येथील विनोद पांगम यांनी तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेतील सजावटींमधून ग्रामस्थांनी गणेशभक्तीबरोबरच कलाविष्काराचे दर्शन घडविल्याने स्पर्धेला विशेष रंगत प्राप्त झाली.

याशिवाय शरद पुजारे (भोळेवाडी), नितीन गरटे (भोळेवाडी), तुकाराम गोविंद तोरसकर (तळेवाडी), संतोष तेली (नारलेसखलवाडी), सोनाली भिकाजी साटम (गावठण साटमवाडी), राजेंद्र नवले (पणकेवाडी) आणि विशाल नारायण तांबे (तांबे वाडी) यांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या स्पर्धेचे परीक्षण चित्रकार अक्षय मेस्त्री आणि पत्रकार निकेत पावसकर यांनी केले.

या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीराम पुजारे, सल्लागार रमेश नादकर तसेच समिती सदस्य मधुकर तेली, गोपाळ तेली, प्रकाश राऊत, प्रकाश बाणे, संतोष गुरव, ॲड. समीर सुर्वे यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेमुळे गावातील गणेशोत्सवाला अधिक उत्साह प्राप्त झाला असून, विजेत्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. विजेत्या स्पर्धकांना विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे.

शेअर करा