तळेरे : ज्येष्ठ बालसाहित्यिक बाबुराव शिरसाट यांच्या कवितेचा तिसरीच्या पुस्तकात समावेश : बालभारतीचा हिरकमहोत्सवी वर्ष

शेअर करा

तळेरे,दि.१४ जून

ज्येष्ठ बाल साहित्यिक बाबुराव शिरसाट यांची “ग्रंथ मंदिर” ही कविता मराठी बालभारतीच्या जून-२६ पासून नव्याने प्रकाशित होणाऱ्या तिसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ठ करणेत आली आहे. शिरसाट हे कणकवली येथील कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट चे सल्लागार आहेत.

हे वर्ष बालभारतीचे हिरकमहोत्सवी वर्ष असून यावर्षी इयत्ता तिसरीचे पाठ्यपुस्तक बदलले आहे. त्यामध्ये शिरसाट यांची “ग्रंथ मंदिर” ही कविता अभ्यासक्रमात समाविष्ट झालेली आहे. शिरसाट यांच्या “रोज नवा सूर्य” या बालकविता संग्रहातील कविता असून भातुकली प्रकाशन, मुंबई या संस्थेने पुस्तक प्रकाशित केले आहे.

शिरसाट यांची बाल साहित्याच्या विविध प्रकारामध्ये २७ पुस्तके प्रकाशित आहेत. नुकताच त्यांच्या “चिमाची गोष्ट” या बालकथा संग्रहाला अखिल भारतीय बालकुमार साहित्य सभेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आकाशवाणीसाठी शिळोप्याच्या गप्पा, अवतीभवती, जीवनरंग या मालिकांचे लेखन केले आहे. सह्याद्री वाहिनीवरील ‘ काव्यकुंज ‘ कार्यक्रमामध्ये त्यांच्या कवितवाचन झाले आहे. तर सांगली, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून बालकथा, लघुकथा, बालनाटिका, बालकविता अशा विविध 51 कार्यक्रमांचे लेखन, सहभाग आणि मुलाखत प्रसारित झाल्या आहेत.

यापूर्वी त्यांच्या ‘मॉरल स्टोरीज’ आणि ‘अन्फॉर्च्यूनेट ट्री’ या दोन इंग्रजी अनुवादित पुस्तकाची निवड शासनाच्या शिक्षण विभागाकडून इ. ६ वी ते इ. ८ वी साठी पूरक वाचनासाठी निवड झालेली आहे.

शेअर करा