तळेरे, दि. १ जुलै
वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, व्यसनमुक्ती आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘नशामुक्त भारत’ व ‘सायबर सुरक्षितता’ या विषयांवर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कणकवली तालुका पोलीस विभागाच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) सौ. बर्गे मॅडम तसेच पोलीस हवालदार श्री. पांडुरंग पांढरे उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा सिंधुदुर्ग पोलीस विभाग आणि MKCL तसेच श्रावणी कंप्यूटर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला होता
या कार्यक्रमासाठी सौ. श्रावणी सतीश मदभावे (मा. जिल्हाध्यक्ष, नशाबंदी मंडळ, सिंधुदुर्ग) आणि श्री. सतीश चंद्रकांत मदभावे (संस्थापक-संचालक, श्रावणी कंप्युटर) यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
सौ. श्रावणी मदभावे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेचे कौटुंबिक जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत विस्तृत आणि उदाहरण पर दाखल्यासह मार्गदर्शन केले, त्यापासून दूर राहण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक तयारी, चांगल्या सवयींचे महत्त्व आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यात विद्यार्थ्यांची भूमिका याविषयी वास्तव उदाहरणांसह प्रभावी मार्गदर्शन केले.
त्यानंतर श्री. सतीश मदभावे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सोशल मीडिया, सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, डिजिटल गोपनीयता, ओटीपी व पासवर्ड सुरक्षितता तसेच जबाबदारीने इंटरनेटचा वापर यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. बदलत्या डिजिटल युगात सुरक्षित राहून तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर कसा करावा, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली.
यावेळी पीएसआय सौ. बर्गे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करत कायद्याचे पालन, सामाजिक जबाबदारी आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. संपूर्ण मार्गदर्शन सत्र विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरले.
या प्रसंगी कणकवली तालुका पोलीस विभागाच्या वतीने सायबर जनजागृती व नशामुक्त भारत अभियानामध्ये सातत्याने उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्रावणी कंप्युटर संस्थापक-संचालक श्री. सतीश मदभावे तसेच सौ. श्रावणी सतीश मदभावे यांचे विशेष कौतुक करण्यात आले. समाजहितासाठी राबविल्या जाणाऱ्या त्यांच्या उपक्रमांचे उपस्थितांनी मनापासून स्वागत केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन यांनी मोलाचे सहकार्य केले. उपस्थितांनी अशा जनजागृतीपर उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक सहाय्यक शिक्षिका तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते