तळेरे : श्रावणी सोमवारच्या भक्ति सोहळ्यात सिंधू फाउंडेशनचा नशामुक्त सिंधुदुर्गाचा निर्धार

शेअर करा

कृतज्ञता सोहळ्यात भजनी बुवांनी स्वीकारला नशामुक्तीचा संकल्प

तळेरे,दि.०८ सप्टेंबर

श्रावणी सोमवारचे औचित्य साधून तळेरे येथील श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशन येथे आयोजित ‘कृतज्ञता बंध सोहळ्या’त नशामुक्त सिंधुदुर्गासाठी सामूहिक संकल्प करण्यात आला. डॉ. अनिल नेरुरकर (M.D.) यांच्या प्रेरणेतून सिंधू फाउंडेशनतर्फे गेल्या १६ वर्षांपासून सुरू असलेल्या तंबाखू व व्यसनमुक्ती अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सतीश मदभावे यांनी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. हे अभियान नागरिकांच्या सहकार्यामुळे सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. भजनी मंडळे, वारकरी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांच्या उपस्थितीत भक्तीबरोबरच व्यसनमुक्तीचा संदेश गावागावांत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पान, सुपारी, तंबाखू आणि इतर नशाकारक पदार्थांचा त्याग करून ‘आरोग्यदायी तबकडी’ स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. “एक मंडळ, एक गाव – एक संकल्प; अनेक मंडळे – एक चळवळ; संपूर्ण सिंधुदुर्ग – नशामुक्तीचा निर्धार,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

नाईकधुरे बुवा आणि उदय पारकर बुवा यांनी नशामुक्तीवर आधारित अभंग व गजर सादर केले. त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला भक्तिमय वातावरण लाभले आणि सामाजिक प्रबोधनालाही प्रभावी दिशा मिळाली. उपस्थित मान्यवरांचा मानवंदना देऊन सन्मानपत्राने गौरव करण्यात आला.

सिंधू फाउंडेशनच्या माध्यमातून भजनी मंडळांनी नशामुक्तीचा संदेश पोहोचवावा : राजू जठार

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटनेचे कार्यवाहक राजू जठार म्हणाले, “भजन आणि डबलबारीच्या कार्यक्रमांना नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे भजनी मंडळांनी नशामुक्तीचा विषय आपल्या कार्यक्रमांचा भाग केला, तर हा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत प्रभावीपणे पोहोचेल.”

सिंधू फाउंडेशनच्या उपक्रमातून व्यसनामुळे अमूल्य देहाची हानी करू नका : प्रकाश पारकर बुवा

कणकवली तालुका भजनी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पारकर बुवा यांनी व्यसनमुक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. “भगवंताने दिलेला हा अमूल्य देह जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन त्याची हानी करू नये. प्रत्येक भजनी बुवाने नशामुक्तीचा संदेश भक्तीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवावा,” असे आवाहन त्यांनी केले.

सिंधू फाउंडेशनच्या माध्यमातून भजनी मंडळांनी आदर्श निर्माण व्हावा : श्रावणी मदभावे

श्रावणी मदभावे म्हणाल्या, “सिंधुदुर्गातील भजनी मंडळांच्या माध्यमातून नशामुक्ती प्रबोधनाचा आदर्श निर्माण व्हावा आणि तो महाराष्ट्रासह देशभर पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. भक्ती आणि सामाजिक जागृतीच्या माध्यमातून जिल्हा व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न आहे.”

सिंधू फाउंडेशनच्या उपक्रमात कलाकारांची सामाजिक जबाबदारी महत्त्वाची : शशांक तळेकर

शशांक तळेकर यांनी कलाकारांच्या सामाजिक भूमिकेवर प्रकाश टाकला. “आई-वडील आणि गुरुजनांनंतर समाजाच्या जडणघडणीत कलाकारांचा मोठा वाटा असतो. भजनी बुवांच्या माध्यमातून नशामुक्तीची जनजागृती करण्याचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे,” असे ते म्हणाले.

‘आजपासून भजनात तंबाखूची तबकडी नसेल’ : संतोष कानडे बुवा

सिंधुदुर्ग भजन संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे बुवा यांनी ठाम भूमिका जाहीर केली. “पान, सुपारी आणि तंबाखूची तबकडी आजपासून आमच्या भजनांमध्ये असणार नाही. नशामुक्तीचा संदेश गावागावांत पोहोचविण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत,” असे त्यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला संतोष कानडे बुवा, प्रकाश पारकर बुवा, दीपक पाळेकर बुवा, संदीप नाईकधुरे बुवा, मंगेश खाड्ये बुवा, चंद्रकांत कानकेकर बुवा, उदय पारकर बुवा, महानंद चव्हाण, चंद्रकांत गुरव बुवा, सुदर्शन फोपे बुवा, संतोष तळेकर बुवा, सागर मोहिते बुवा, पियाळीचे उपसरपंच ढवण, माजी उपसरपंच शशांक तळेकर, राजू जठार, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, ज्येष्ठ पत्रकार तथा अध्यक्ष उदय दुदवडकर, पत्रकार अंकित घाडी आणि दळवी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रशांत हाटकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

सिंधू फाउंडेशनतर्फे तंबाखू व व्यसनमुक्तीबरोबरच महिला सबलीकरण, कौशल्य विकास आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रातही उपक्रम राबविले जात आहेत. युवक आणि कुटुंबांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

भजन-कीर्तनातून भक्तीचा संदेश देतानाच व्यसनमुक्तीची जनजागृती करून आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी एकत्र काम करण्याचा निर्धार सोहळ्यात करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अनिल नेरुरकर (M.D.) प्रेरित सिंधू फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले.

शेअर करा