तळेरे ; वेळगिवे येथील ब्राह्मणदेव वहाळातील गाळामुळे पाणीटंचाईचे सावट; सभापती गणेश राणे यांच्याकडून पाहणी

शेअर करा

या समस्येकडे पंचायत समिती सदस्य समृद्धी चव्हाण यांनी वेधले लक्ष

तळेरे,दि.११ सप्टेंबर
देवगड तालुक्यातील वेळगिवे येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान स्वयंभू श्रीदेव रामेश्वर मंदिराजवळील बारमाही वाहणाऱ्या ब्राह्मणदेव वहाळात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. यामुळे वहाळातील पाण्याची पातळी चिंताजनकरीत्या खालावली असून परिसरातील नळपाणी पुरवठा योजनेवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर फणसगाव पंचायत समिती सदस्या कु. समृद्धी चव्हाण व स्थानिक ग्रामस्थांनी देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांचे या समस्येकडे लक्ष वेधले.
ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत सभापती गणेश राणे यांनी नुकताच वेळगिवे परिसराचा दौरा करून ब्राह्मणदेव वहाळाची प्रत्यक्ष पाहणी केली. वेळगिवे येथील या वहाळातील पाण्यावर वेळगिव्यासह विठ्ठलादेवी, बुरंबवडे आणि वाघिवरे या चार गावांतील नळयोजना अवलंबून असून, तेथून दिवसरात्र पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि वहाळात साचलेल्या गाळामुळे पाणीसाठा घटला आहे. आगामी काळात या चारही गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये, यासाठी वहाळातील गाळ काढणे अत्यंत गरजेचे असल्याचे समृद्धी चव्हाण यांनी पाहणीदरम्यान स्पष्ट केले.
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन सभापती गणेश राणे यांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला गाळ उपसा करून पाणीसाठा वाढवण्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही सभापती राणे यांनी दिले.
प्रशासकीय पातळीवर योग्य पाठपुरावा करून गाळ काढण्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावले जाईल आणि परिसरावरील पाणीटंचाईचे संकट टळेल, असा विश्वास समृद्धी चव्हाण यांनी व्यक्त केला.
या पाहणी दौऱ्यावेळी बापर्डे पंचायत समिती सदस्या संजना लाड, उपसरपंच सहदेव लाड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण देवस्थळी, देवस्थानचे मानकरी लाड बंधू, माजी सरपंच संतोष चव्हाण, राजेश गिरी यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा