“गर्भ” – जीवनाचं चिंतन मांडणारं नाटक कणकवली येथे १९ जून रोजी प्रस्तुत होणार
तळेरे,दि.१७ जून
मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित “गर्भ” – जीवनाचं चिंतन मांडणारं नाटक दि. १९ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता निलायम कणकवली येथे सादर होणार आहे. तरी नाट्य रसिकांनी याचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
माणूस निसर्गाच्या कुशीत जन्मलेली सर्वात विलक्षण आणि कदाचित सर्वात गुंतागुंतीची कलाकृती. निसर्गानं निर्माण केलेल्या सर्व सृष्टीत डोंगर, नद्या, समुद्र, आकाश, वारा, फुलं, फळं, औषधी, प्राणी-पक्षी...या साऱ्यांवर पहिला हक्क आपण माणसांनीच गाजवला. एवढ्यावरच समाधान मानलं नाही, तर इतर जीवांवर, अगदी आपल्या स्वतःसारख्या माणसांवरही अधिराज्य प्रस्थापित केलं. कधी शांततेच्या नावाखाली, कधी क्रांतीच्या, कधी विचारधारेच्या, तर कधी सत्तेच्या आणि लोभाच्या. पण अखेरीस हाती काय आलं? सुख? समाधान? की केवळ एक शून्य ?
निसर्गानं सृष्टी रचली तेव्हा तिच्या प्रत्येक रचनेत सौंदर्य आणि शांती होती. पण आजच्या माणसाच्या जीवनात त्या सौंदर्याचा व शांतीचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. का बरं? कोणत्या क्षणी आपण आपल्याच अस्तित्वापासून दूर गेलो? धर्मग्रंथ, तत्वज्ञान, विचारसरणी यामध्ये या प्रश्नांची उत्तरं शोधली गेली, पण ती उत्तरं माणसाच्या आत्म्याला स्पर्श करु शकली नाहीत.
या सर्व प्रश्नांना भिडण्याचा, त्यावर भाष्य करण्याचा पुढाकार रंगकर्मी मंजुल भारद्वाज यांच्या “गर्भ” या नाटकात दिसून येतो. हे नाटक एक चिंतन आहे, एक मानसिक आणि भावनिक यात्रा आहे.
नाटकाची सुरुवात होते निसर्गाच्या सौंदर्यदर्शनाने. पण जसजसं ते माणसाच्या अस्तित्वाच्या गाभ्यापर्यंत पोहोचतं, तसतसं नाटकाचं रूप अधिकच गहिरं, अंतर्मुख होत जातं. माणूस नेहमी सुखशांतीचा ध्यास घेतो, पण तोच ध्यास त्याला अशांततेच्या गर्तेत लोटतो. “गर्भ” या नाटकात हे द्वंद्व ठळकपणे समोर येतं.
“गर्भ” हे नाटक म्हणजे शब्दांत गुंफलेली वेदना आहे, विचारांचं चिंतन आहे आणि आशेचा एक नवा किरण आहे. हे नाटक एक अनुभव आहे . मनात खोलवर रुजणारं, अंतर्मनाला हलवणारं. नाटक सांगतं, की आपण सगळे एका गर्भातून जन्म घेतो, पण समाज, संस्कार, परंपरा आणि शिक्षण या नावाखाली आपण पुन्हा एक अदृश्य गर्भात अडकतो. त्या गर्भातून बाहेर पडणं, म्हणजे खरं माणूस होणं.
आजच्या काळात, जिथे माणुसकीचा अधःपात आपल्याला स्पष्टपणे दिसतो आहे, तिथे “गर्भ” या नाटकातून एक आशावादी सूर उगम पावतो. “जीवन सुंदर आहे!” हे नाटक एक सामाजिक जागृती आहे, एक संवेदनशील क्रांती आहे.
मुख्य अभिनेत्री अश्विनी हिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे नाटकाला वेगळीच उंची प्राप्त होते. हे समजणं कठीण होतं की ती रंगभूमीवर नाटकातील व्यक्तिरेखा साकारते आहे की स्वतःच्या मनोवस्था आणि अनुभव प्रेक्षकांसमोर मांडते आहे. तिच्यासोबत सायली पावसकर,तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, कोमल खामकर या सर्व कलाकारांनी अतिशय मनस्वीपणे आपापल्या भूमिका साकारल्या. विशेषतः सायली आणि कोमल यांचा अभिनय संयत, पण प्रभावी आहे.
त्यांच्या देहबोलीतून, मुद्रांमधून आणि प्रत्येक क्षणाच्या सादरीकरणातून नाटकाची उंची अधिकच वाढली.
संगीतात नीला भागवत यांनी दिलेली साथ नाटकाला शब्दांच्या पलीकडे आध्यात्मिक स्व:शी जोडते.
“गर्भ” हे नाटक म्हणजे प्रेक्षकांच्या मनात जन्म घेणारा विचारांचा एक नवा गर्भ आहे. जो एक दिवस नव्या माणुसकीचं आणि नव्या जाणिवांचं बीज रोवेल.