तळेरे ,दि.०९ सप्टेंबर
गणेशोत्सव म्हटला की प्रत्येकजण आपले घर, अंगण आणि परिसर स्वच्छ करण्याला प्राधान्य देतो. मात्र, गावाच्या विकासासाठी तसेच व्यवसाय आणि दैनंदिन वाहतुकीसाठी महत्त्वाचे असलेले रस्ते व पायवाटाही स्वच्छ आणि सुरक्षित असणे तितकेच गरजेचे आहे. हीच सामाजिक जाणीव मनात ठेवून तळेरे गावठण व घाडीवाडी येथील युवा वर्गाने श्रमदानातून गावठण परिसरातून गांगेश्वर मंदिर व घाडीवाडीकडे जाणार महत्त्वाचा रस्ता स्वच्छ केला.
या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात नागरिकांची व वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने तसेच काही झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर भाविक व नागरिकांची वर्दळ वाढणार असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला.
युवकांनी श्रमदानातून रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडी, रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या तसेच इतर अडथळे हटवून मार्ग वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित केला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवा वर्गाने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविल्याने ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
गणेशोत्सव हा केवळ घर आणि मंदिरापुरता मर्यादित न राहता आपल्या गावाचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्याची प्रेरणा देणारा उत्सव ठरावा, असा संदेश या उपक्रमातून युवकांनी दिला आहे.