कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशन, सिंधुदुर्ग-कणकवली यांच्या वतीने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता कणकवली येथील श्री भवानी सभागृह, तेलीआळी येथे पर्यटन क्षेत्रात कार्य करणाऱ्या तसेच पर्यटन विषयात आवड असलेल्या पर्यटनप्रेमींची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य “शिक्षणाद्वारे पर्यटनाचे रूपांतरण (Transforming Tourism through Education)” असे आहे. या विषयावर बैठकीत विशेष चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन क्षेत्रातील कौशल्य विकास, क्षमता निर्माण, ज्ञानाचे आदान-प्रदान यांसह जागतिक पर्यटन दिनाचे महत्त्व यावर विचारविनिमय केला जाणार आहे.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाची सद्यस्थिती, पर्यटन क्षेत्रासमोरील विविध संधी व आव्हाने आणि भविष्यात पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी याबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे.
या बैठकीस संस्थेचे सभासद, पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेले सहकारी तसेच पर्यटन विकासात रस असलेल्या पर्यटनप्रेमींनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी केले आहे.