लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मान्यता; संजय राऊत तातडीने भेटीसाठी रवाना, ‘ऑपरेशन टायगर’ची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींना मोठे राजकीय वळण मिळाले आहे. पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज सादर केल्याची माहिती समोर आली असून, त्या गटाला मान्यता मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, या निर्णयापूर्वी ठाकरे गटाची बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. यासाठी खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांकडे पत्रही पाठविले होते. मात्र, स्वतंत्र गटासाठीचा अर्ज आधीच दाखल झाल्याने घटनाक्रम वेगाने पुढे सरकल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत, अनिल देसाई आणि अनिल सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेत आपली भूमिका मांडल्याची माहिती आहे. तसेच सहा खासदारांच्या स्वतंत्र गटाला मान्यता मिळाल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चांना उधाण आले असून, शिंदे गटात विलिनीकरणाचा मार्ग खुला झाल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
या संपूर्ण घडामोडींमुळे ठाकरे गटाच्या संसदीय ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.