ऐनारी साईलवाडी येथील मानसिक उपचार सुरू असलेले व्यक्ती ३० जुलैपासून बेपत्ता; कणकवलीत शेवटचे दर्शन झाल्याची माहिती
वैभववाडी,दि.०४ ऑगस्ट
वैभववाडी तालुक्यातील ऐनारी साईलवाडी येथील प्रकाश सखाराम मोहिते (वय ६०) हे ३० जुलै २०२६ पासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही अद्याप ठावठिकाणा लागलेला नसल्याने त्यांचे भाऊ जगन्नाथ सखाराम मोहिते यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश मोहिते यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असून त्यांच्यावर २०१४ पासून उपचार सुरू आहेत. ते तिरवडे येथे राहणाऱ्या आपल्या चुलत बहिणीकडे गेले होते. ३० जुलै रोजी “मी घरी जातो,” असे सांगून ते तेथून निघाले. त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास ते कणकवली येथे गावातील एका ग्रामस्थाला दिसून आले होते. मात्र त्यानंतर त्यांचा कोणताही मागमूस लागलेला नाही. अखेर त्यांचा भाऊ जगन्नाथ मोहिते यांनी वैभववाडी पोलीस ठाणेत फिर्याद दिली आहे.