Sawantwadi News : TEDxIBS Pune च्या प्रतिष्ठित व्यासपीठावर लखमराजे आणि श्रद्धाराजे भोंसले यांचे विचारमंथन!

शेअर करा

‘Beyond Boundaries’ संकल्पनेवर मांडले विचार; पुण्यातील कार्यक्रमात मिळाली विशेष संधी!

सावंतवाडी,दि. ३१ ऑक्टोबर

संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले व सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांना नुकतेच पुणे येथे आयोजित TEDxIBS Pune या प्रतिष्ठित व्यासपीठावर आपले विचार मांडण्याची संधी मिळाली. यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना Beyond Boundaries अशी होती.

TED हे जगातील सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या व्यासपीठांपैकी एक असून येथे विविध क्षेत्रांतील विचारवंत, उद्योजक, नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती आणि समाजात सकारात्मक बदल घडवणारे लोक आपले विचार, अनुभव आणि जीवनप्रवास मांडतात. TEDx हे TED च्या अधिकृत परवानगीने स्वतंत्रपणे आयोजित केले जाणारे व्यासपीठ असून अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेरणादायी विचार आणि कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. या व्यासपीठावर युवराज व युवराज्ञी यांनी सावंतवाडीतील प्रवास मांडला.एका ऐतिहासिक राजवाड्याचे बुटीक आर्ट हॉटेलमध्ये रूपांतर करण्यापासून ते या शहराचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची आमची जबाबदारी याविषयी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

तसेच सावंतवाडीचा वारसा जपणे, येथील पारंपरिक कला आणि हस्तकलेला प्रोत्साहन देणे, स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, महिला आणि तरुणांना सक्षम करणे तसेच शहराच्या सर्वांगीण विकासात अर्थपूर्ण योगदान देणे, या आमच्या प्रयत्नांबद्दल यावेळी त्यांनी सांगितले. सावंतवाडी पॅलेस उभारणे म्हणजे केवळ एक हॉटेल किंवा व्यवसाय उभारणे नव्हते, तर आपल्या शहराला आणि इथल्या लोकांना काहीतरी परत देण्याचा तो एक प्रयत्न होता. आपली मुळे जिथे रुजलेली आहेत, त्या भूमीप्रती आपली काही जबाबदारी असते, असा आपला ठाम विश्वास आहे. सावंतवाडीने प्रगती करावी, समृद्ध व्हावे आणि तिची खरी ओळख जगभर पोहोचावी, हीच आमची इच्छा आहे असे मत सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केले. तर आमचा हा प्रवास आणि सावंतवाडीविषयीचे आमचे विचार TEDx सारख्या जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या व्यासपीठावर मांडता आले, ही आमच्यासाठी विशेष आनंदाची बाब आहे. सावंतवाडीसारख्या आपल्या शहराची गोष्ट भौगोलिक सीमा ओलांडून एका मोठ्या व्यासपीठावर पोहोचवण्याची ही एक अनोखी संधी होती अशी भावाना युवराज लखमराजे भोंसले यांनी व्यक्त केली.

शेअर करा