Malvan News : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी समाजामध्ये पाणी बचतीचा संदेश पोहोचवावा – प्रा. हसन खान

शेअर करा

सिंधुदुर्ग महाविद्यालयात दुष्काळ जनजागृतीपर मार्गदर्शन संपन्न

मालवण,दि. ३१ ऑक्टोबर

कोकणात प्रथमच मोठ्या स्वरूपाचा दुष्काळ जाणवत आहे. याला एलनिनो सोबतच कोकणात झालेले अनेक भौगोलिक बदलही जबाबदार आहेत. पावसाचे पाणी साठवणे, जलसंधारणाची कामे करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे यांसारख्या उपाययोजनांद्वारे दुष्काळाच्या समस्येवर मात करता येऊ शकते, विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाबाबत जागरूक राहून समाजामध्ये पाणी बचतीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन पर्यावरणतज्ज्ञ व भूगोल अभ्यासक प्रा. हसन खान यांनी येथे बोलताना केले.

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने दुष्काळ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रा. हसन खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते, एनसीसी अधिकारी डॉ. एम. आर. खोत, प्रा. संकेत बेळेकर आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांनी केले.

यावेळी प्रा. हसन खान यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळाची कारणे, त्याचे पर्यावरणीय परिणाम आणि त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे विश्लेषण केले. सन २०१५ मध्ये एल निनोचा प्रभाव असतानाही कोकणावर त्याचा तुलनेने कमी परिणाम झाला होता; मात्र सन २०२६ मध्ये एल निनोच्या प्रभावामुळे कोकणातील संपूर्ण परिसंस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. सन २०१५ ते २०२६ या कालावधीत घडलेले विविध भौगोलिक बदल, सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील वृक्षतोड आणि जंगलतोड यांसारखे घटकही सध्याच्या परिस्थितीला कारणीभूत आहेत. जंगलांचे घटते आच्छादन, नैसर्गिक जलचक्रातील बदल आणि पाण्याच्या उपलब्धतेवरील परिणाम लक्षात घेता सह्याद्रीच्या जंगलांचे संरक्षण व नैसर्गिक परिसंस्थांचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रा. खान यांनी सांगितले. कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण कातळसडे व कातळ यांच्या पाणी साठवण क्षमतेचेही विश्लेषण प्रा. खान यांनी करत या नैसर्गिक भूरचनांचे संवर्धन केल्यास पाण्याचे नियोजन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होऊ शकते, असे स्पष्ट केले.

प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी पाणी बचतीचे महत्त्व विशद करत पाण्याचा वापर जाणीवपूर्वक आणि काटकसरीने करणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. संकेत बेळेकर यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आणि नियोजनासाठी डॉ. संकेत बेळेकर, प्रा. योगिता सावंत, प्रा. अनघा टिकले, अपूर्वा पालव, रिद्धी काजरेकर आणि हर्षद पाटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) स्वयंसेवक उपस्थित होते.

शेअर करा