वैभववाडीत दहीहंडीचा जल्लोष

शेअर करा

पारंपरिक गीतांसह ‘गोविंदा आला रे’चा जयघोष; बालगोपालांसह तरुणांमध्ये उत्साह

वैभववाडी,दि.०५ सप्टेंबर

‘गोविंदा रे गोपाळा… यशोदेच्या तान्ह्या बाळा… तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा…’ अशा पारंपरिक गीतांच्या तालावर आणि ‘गोविंदा आला रे…’च्या जयघोषात वैभववाडी तालुक्यात शनिवारी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वैभववाडी शहरासह ग्रामीण भागातील गावागावांत ठिकठिकाणी दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. त्या फोडण्यासाठी बालगोपालांसह तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
    दहीहंडी उत्सवानिमित्त सकाळपासूनच सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. विविध ठिकाणी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचून उंचावर बांधलेल्या दहीहंड्या फोडण्याचा थरार अनुभवला. लहान मुलांपासून युवकांपर्यंत सर्वांनी या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दहीहंडी फुटताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि जयघोष करीत गोविंदांचा उत्साह वाढविला.

एक लाख रुपयांच्या दहीहंडीचे प्रमुख आकर्षण..

     वैभववाडी शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने इनामदार प्लाझाच्या भव्य पटांगणात एक लाख रुपयांची भव्य दहीहंडी बांधण्यात आली होती. शहरातील दहीहंडी उत्सवाचे हे प्रमुख आकर्षण ठरले. आकर्षक सजावट आणि दहीहंडी फोडण्याचा थरार अनुभवण्यासाठी सायंकाळपासूनच नागरिकांनी परिसरात मोठी गर्दी केली होती.
या ठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. विविध गाण्यांच्या तालावर तरुणाईसह नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संगीताच्या तालावर आणि गोविंदांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
दहीहंडी फोडण्यासाठी विविध गोविंदा पथक  मानवी मनोरा रचताना गोविंदांचा उत्साह आणि उपस्थित नागरिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. प्रत्येक प्रयत्नानंतर उपस्थित नागरिकांकडून गोविंदांना उत्स्फूर्त प्रोत्साहन मिळत होते. डोंबवली येथील महिलांच्या गोविंदा पथकाने पाच थराची सलामी दिली. दहीहंडी उत्सवानिमित्त वैभववाडी शहरात सायंकाळी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत हा थरार सुरु होता.

शेअर करा