वैभववाडी ,दि.१७ जून
जिल्हा परिषद कोळपे आयोजित प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे व बी.के.एल. वालावलकर रुग्णालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दि. 23 जून रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र, उंबर्डे येथे होणार आहे. या शिबिरात विविध आजारांवरील तपासणी व उपचार सल्ला दिला जाणार असून शासन योजनेंतर्गत तसेच अल्पदरात शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिबिरात अँजिओप्लास्टी, कर्करोग शस्त्रक्रिया, पित्ताशयातील खडे, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया, बायपास सर्जरी, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथी व मोतीबिंदू आदी आजारांवरील उपचारांसाठी नोंदणी केली जाणार आहे.
तसेच हर्निया, महिलांच्या गर्भाशयाचे आजार, थायरॉईड शस्त्रक्रिया, मणक्याच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, अपेंडिक्स, मूळव्याध, स्तनांमधील गाठी, हायड्रोसिल व इम्प्लांट रिमुवल आदी शस्त्रक्रियांसाठीही मार्गदर्शन व नोंदणीची सुविधा उपलब्ध राहणार आहे. शिबिरात जनरल सर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, बालरोग तज्ज्ञ, ऑर्थोपेडिक तज्ज्ञ व नेत्ररोग तज्ज्ञांकडून रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. जिल्हा परिषद सदस्य तथा प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे जनआरोग्य समितीचे अध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.