वैभववाडी : पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याची सवय आत्मसात करूया – पालकमंत्री नितेश राणे

शेअर करा

नाधवडे येथे भातशेतीची पाहणी; बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची ग्वाही

वैभववाडी ,दि.२७ सप्टेंबर

कोकणात यंदा निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नाही, अशी भीषण स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ट्रिगर वनमध्ये समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून, मुख्यमंत्री शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याच्या भूमिकेत आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान आणि प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती शासनापर्यंत पोहोचविण्यासाठीच जिल्हा दौरा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधून वस्तुस्थिती जाणून घेतली असून, शासनासमोर सिंधुदुर्गची बाजू भक्कमपणे मांडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
   
  

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी रविवारी वैभववाडी तालुक्यातील नाधवडे, नवलादेवीवाडी परिसरातील भातशेतीच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बासुर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, श्रावणी सुतार, रिद्धी सुतार, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, साधना नकाशे, सुधीर नकाशे, नासिर काझी, भालचंद्र साठे, महेश संसारे, बंड्या मांजरेकर, प्राची तावडे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

  पालकमंत्री राणे यांनी शेतकरी तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून तालुक्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेतला. तालुक्यात पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान होत असून, भाताबरोबरच नाचणी व पाण्या अभावी ऊस पिकेही धोक्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली. नुकसानग्रस्त क्षेत्राची वस्तुस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि अपेक्षित मदतीबाबतही त्यांनी माहिती घेतली.
शासनाकडून मदतीचे निकष निश्चित करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्यक्ष नुकसानीचा विचार व्हावा, यासाठी आवश्यक माहिती संकलित करून ती शासनापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी, यासाठी जिल्ह्याची बाजू ठोसपणे मांडली जाईल, असेही पालकमंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

शेअर करा