वैभववाडी,दि.२४ जून
मधुकर सिताराम भुर्के माध्यमिक विद्यालय, मांगवली येथे विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी शैक्षणिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम स्वरूपातील पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश जागुष्टे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये पंचायत समिती सदस्या सुवर्ण संसारे, संस्थेचे उपाध्यक्ष महेश संसारे, सामाजिक कार्यकर्ते देवानंद पालांडे, शिक्षक महेंद्र मोरे, देवानंद कदम, अभय कांबळे, दीपक मांडवकर, अल्पेश जागुष्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
सन २०२४-२५ च्या माध्यमिक शालांत परीक्षा निकालात विद्यालयात व भुईबावडा केंद्रात प्रथम तसेच वैभववाडी तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या कु. सोनल दीपक मांडवकर (९४ टक्के) हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच निवृत्ती मंगेश कांबळे (८६.६० टक्के) याने विद्यालयात द्वितीय, तर गायत्री विजय जाधव (८३.४० टक्के) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.
विद्यालयातील विशेष पुरस्कारांमध्ये ‘आशा गणित विद्यार्थी’ म्हणून सोनल मांडवकर, ‘अशोक विज्ञान विद्यार्थी’ म्हणून कुणाल राजेश कांबळे आणि ‘आशा-अशोक गुणी विद्यार्थिनी’ म्हणून सिद्धी प्रवीण जावडेकर हिची निवड करण्यात आली. याशिवाय इयत्ता सातवी, आठवी व नववीतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनाही रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
कै. अशोक जावडेकर, लक्ष्मण (अण्णा) कोलते, श्रीधर राणे आणि रामराव निकम यांच्या कायम ठेव रकमेवरील व्याजातून ही पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच संस्थेचे संचालक रविंद्र ढवळे यांनी दहावीतील प्रथम तीन क्रमांक व प्रत्येक विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन गौरविले.
यावेळी नाधवडे केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल संजय पाटील, वेंगसर केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल ज्योत्स्ना पाटील तसेच सामाजिक कार्यकर्त्या दीपिका रांबाडे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका भारती भोसले यांनी केले. सूत्रसंचालन शरद कांबळे यांनी, तर आभार प्रदर्शन जनार्दन भोसले यांनी केले.