एडगाव, तांबेवाडी व वायंबोशी अंगणवाडी केंद्रांचा संयुक्त उपक्रम; तृणधान्ये, रानभाज्यांच्या पाककृतींचे प्रदर्शन
वैभववाडी,दि.१० सप्टेंबर
“सुदृढ बालक, सक्षम भारत” या संकल्पनेतून अंगणवाडी स्तरावर पोषणविषयक जनजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. बालकांच्या आरोग्यासाठी दैनंदिन आहारात तृणधान्ये, रानभाज्या तसेच विविध पौष्टिक घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे. अंगणवाडी स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लोरे जिल्हा परिषद सदस्या रिद्धी रितेश सुतार यांनी केले.
‘सुपोषित बालक, सशक्त भारत’ या उद्देशाने आयोजित ९व्या राष्ट्रीय पोषण माह निमित्त एडगाव येथील अंगणवाडी केंद्रात एडगाव, तांबेवाडी आणि वायंबोशी या तीन अंगणवाडी केंद्रांचा संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी तृणधान्यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध पौष्टिक पाककृती तसेच रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन रिद्धी रितेश सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी प्रदर्शनाची पाहणी करून पौष्टिक आहाराचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.
कार्यक्रमात संतुलित आहाराचे महत्त्व, तृणधान्यांचा आहारातील वापर, पौष्टिक आहाराचे फायदे तसेच बालकांचे आरोग्य, पोषण आणि संगोपन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिला पालकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली काकडे, ग्रामपंचायत एडगावचे प्रशासक प्रविण कुडतरकर, ग्रामपंचायत अधिकारी स्नेहलता सावंत, माजी सरपंच रविना तांबे, माजी उपसरपंच विनोद रावराणे, ग्रामस्थ आबा रावराणे, मुख्याध्यापक दिप्ती पाटील, मुख्यसेविका कोमल सकपाळ तसेच अंगणवाडी सेविका नेहा पवार, रुची रामदास पवार, जागृती जयदीप तांबे, समता अनिकेत तांबे, सीमा अजय शेळके, भारती अडुळकर यांच्यासह अंगणवाडी मदतनीस, महिला पालक व बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका नेहा पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सहकार्य लाभले.