वेंगुर्ला : अधिक मासानिमित्त ३३ श्रीसत्यनारायण पूजा संपन्न

शेअर करा

वेंगुर्ला ,दि.१३ जून (प्रथमेश गुरव)

अधिक मासाचे औचित्य साधून आज शनिवारी वेंगुर्ला येथील एकमुखी दत्त मंदिरात ३३ श्रीसत्यनारायण पूजा करण्यात आल्या. यावेळी बहुसंख्य भाविकांनी उपस्थित रहात एकाचवेळी ३३ श्रीसत्यनारायण पूजेंचे दर्शन घेतले.
मराठी दिनदर्शिकेनुसार सध्या ज्येष्ठ हा अधिकमास सुरू असून १५ जून रोजी तो समाप्त होणार आहे. या अधिकमासात विशेष करून भगवान विष्णूंची पूजा, आराधना करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात आपण ३३ कोटी देवतांची पूजा करतो. अधिकमासात ज्यावेळी भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्यावेळी हे सर्व ३३ कोटी देव प्रसन्न होतात असे मानले जाते. म्हणूनच अधिक मासात ३३ या अंकाला विशेष महत्त्व आहे. त्यानुसार शनिवारी एकमुखी दत्त मंदिरात ३३ श्रीसत्यनारायण पूजेंचे आयोजन केले होते. सकाळी श्रींची नित्यपूजा झाल्यानंतर या श्रीसत्यनारायण पूजेंना प्रारंभ झाला. ब्राह्मणांच्या मंत्रघोषात ३३ यजमानांच्या हस्ते या श्रीसत्यनारायण पूजा संपन्न झाल्या. अधिक मासातील ३३ या अंकाचे विशेष महत्त्व जाणून बहुसंख्य भाविकांनी यावेळी उपस्थित रहात एकाचवेळी ३३ श्रीसत्यनारायण पूजेंचे दर्शन घेतले.

शेअर करा