वेंगुर्त्यात भरीव काम करण्याचा संकल्प नवनवीन कृषी तंत्रज्ञान गावागावात पोहोचविणार – नितीन मांजरेकर

शेअर करा

वेंगुर्ला,दि.०७ ऑगस्ट

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (ATMA) वेंगुर्ले तालुका अध्यक्षपदी आडेली येथील आंबा बागायतदार तथा पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांची फेरनिवड करण्यात आली. मंगळवारी पंचायत समिती सभागृहात घेण्यात आलेल्या आत्मा समितीच्या बैठकीत ही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

आत्मा ही भारतीय कृषी विभागाची एक जिल्हास्तरीय स्वायत्त व नोंदणीकृत संस्था आहे. जी शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाच्या माहितीने सशक्त करण्याचे काम करते. या संस्थेच्या नियामक मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी काम करतात. रोजचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी नियोजन समिती काम करते. स्तरानुसार प्रत्येक तालुक्यात आत्माची तालुकास्तरीय समिती नेमण्यात येते. ज्याद्वारे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रत्यक्षात कृषी तंत्रज्ञान पोहचविण्याचे काम केले जाते. गेली अनेक वर्षे वेंगुर्ले तालुक्यात ही आत्मा समिती सक्रिय कार्यरत असून आत्मा समितीद्वारे भरीव असे कार्य सुरू आहे. शेतकरी गट निर्माण करणे, त्यांना कौशल्य विकास मार्गदर्शन व भांडवल सहाय्य मिळवून देणे, प्रात्यक्षिके आणि प्रदर्शने भरविणे, किसान शास्त्रज्ञ संवाद, शेतकरी अधिकारी चर्चासत्रे, कृषी महोत्सव भरविणे तसेच प्रयोगशील शेतकऱ्याची प्रोत्साहन पुरस्कारासाठी निवड करणे आदी महत्त्वाची कामे आत्मामार्फत केली जातात, अशी माहिती सभेच्या प्रारंभीच वेंगुर्ले आत्मा समितीचे सचिव तथा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धनंजय गोळम यांनी दिली.

सभापती शंकर घारे, तुळस जिल्हा परिषद सदस्या सुजाता पडवळ, आडेली जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, आत्माचे सदस्य बुधाजी उर्फ उमेश येरम, दिलीप मठकर, संजना संजय परब, प्राची गुरव, संध्या राणे, सुधीर आसोलकर आदी यावेळी उपस्थित होते.

नूतन अध्यक्ष नितीन मांजरेकर यांनी आपल्याला पुन्हा एका वर्षासाठी मिळालेले अध्यक्षपद सत्कर्मी लावण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याची ग्वाही दिली. गतवर्षी आपली निवड झाल्यानंतर सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्याने ती कार्यरत झाली नव्हती. वेंगुर्ले तालुक्यात आंबा हे प्रमुख पीक आहे. ज्यावर तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मात्र, अलिकडच्या १०-१५ वर्षात आंबा पिकाला वारंवार बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. आंब्याला हवा तसा दरही मिळत नाही. त्यामुळे येथे पिकणारा आंबा येथेचे प्रोसेस व्हावा व त्यापासून विविध प्रकारची उत्पादने घेता यावीत यासाठी आपला प्रयत्न असेल, असेही नितीन मांजरेकर यावेळी म्हणाले. सभेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन तंत्रज्ञान व्यवस्थापक धनंजय गोळम यांनी केले.

शेअर करा