वेंगुर्ला : अपयशाने खचून न जाता धैर्याने सामोरे जा – डॉ.गोविंद काजरेकर

शेअर करा

नगर वाचनालय संस्थेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

वेंगुर्ला ,दि.२९ जून (प्रथमेश गुरव)

बक्षिस हे प्रोत्साहन असते. ज्या समाजाने आपणास काही दिलेले असते त्याबद्दल कृतज्ञता असावी. परीक्षेतील अपयश किंवा पेपरफुटीमुळे व्यथित होऊन काही विद्यार्थी आत्महत्या करतात. पण हा पर्याय योग्य नाही. अपयशाने खचून न जाता पुन्हा धैर्याने परिक्षेला सामोरे जा असा संदेश बांदा येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मराठी साहित्य समिक्षक डॉ.गोविंद काजरेकर यांनी नगरवाचनालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.


नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेला विविध देणगीदारांनी देणगी दिल्या आहेत. या देणगीतून प्राथमिक, माध्यमिक शालांत परीक्षा, उच्च माध्यमिक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक समारंभ २८ जून रोजी संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर डॉ.गोविंद काजरेकर, नगर वाचनालय संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.देवदत्त परूळेकर, कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार, कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर, व्यासंगी वाचक पुरस्कार प्राप्त वेंगुर्ला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एस.एस.काळे आदी उपस्थित होते.


मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिली ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन तर गिरीजा चव्हाण हिला हुशार होतकरू विद्यार्थीनी म्हणून गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव आजगांवकर याला सन्मानित केले.
यावेळी बोलताना डॉ.काजरेकर यांनी आपले अनुभव सांगितले. ते म्हणाले की, आपण इयत्ता बारावीमध्ये नापास झालो. पण नाऊमेद न होता वाचनाचा ध्यास घेतला आणि पीएचडीपर्यंत पदव्या मिळविल्या. वाचनाने मेंदूचा विकास होतो. ज्ञानग्रहण करणे ही आजन्म होणारी प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वेंगुर्ल्यातून आदर्श नागरिक घडावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन वाचनालयाचे कार्य चालू आहे. वाचनाने मनुष्य समृद्ध बनतो. प्रत्येकाने वाचनाचा ध्यास जोपासावा. आमच्या संस्थेमार्फत विविध उपक्रम कष्टपूर्ण केले जातात. त्यामुळेच येथे दात्यांचा ओघ वाढत असल्याचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी सांगितले. इंग्रजी येण्यासाठी इंग्रजी माध्यम पाहिजे हा गैरसमज आहे. आपण वाचन करून इंग्रजी शिकू शकतो. त्यासाठी इच्छाशक्ती व कठोर परिश्रम आवश्यक असतात. पुस्तक वाचताना आपण विचार करत असतो ही क्रिया मोबाईल पहाताना होत नाही. वाचणाऱ्यांनी एकत्र येऊन चर्चा करावी, असे मार्गदर्शन करताना उपाध्यक्ष अॅड.देवदत्त परूळेकर यांनी सांगितले. कार्यवाह कैवल्य पवार यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेचे विविध उपक्रम, दिले जाणारे पुरस्कार तसेच पारितोषिकांची रचना करणाऱ्या दात्यांविषयी माहिती दिली.
या संस्थेकडे कै.श्रीराम मंत्री यांच्या कायम निधीमधून सुदत्त कल्याण निधी पुरस्कृत व्यासंगी वाचक पुरस्कार देण्यात येतो. सन २०२५-२६ चा व्यासंगी पुरस्कार संस्थेचे वर्गणीदार सभासद तथा वेंगुर्ला हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक एस.एस.काळे यांना त्यांच्या वैविध्यपूर्ण वाचनाबद्दल जाहीर झाला होता. दरम्यान, या पुरस्काराचे वितरणही याच कार्यक्रमात डॉ.गोविंद काजरेकर यांच्या हस्ते श्री.काळे यांना करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गेली ५० वर्षे मी सातत्याने वाचन करीत आहे. सध्याच्या शिक्षकांचे वाचन कमी झाले आहे. वाचन संस्कृतीचा विस्तार होण्यासाठी मोबाईलपासून दूर राहून पुस्तकांशी मैत्री करा असा सल्ला पुरस्काराला उत्तर देताना एस.एस.काळे यांनी दिला.
या कार्यक्रमाला संस्थेचे उपकार्यवाह माया परब, कार्यकारी मंडळ सदस्य मंगल परूळेकर तसेच शरद चव्हाण, साप्ताहिक किरातचे व्यवस्थापक सुनिल मराठे, मेहंदी बोवलेकर, सदानंद तावडे, जॉन्सन डिसोजा, यशोगंधा मोर्जे, मयुरेश सौदागर, विशाखा वेंगुर्लेकर, गौतम शिरसाट, नितीन कुलकर्णी यांच्यासह पारितोषिक प्राप्त विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेश बोवलेकर यांनी केले. शिरसाट मिठाईचे मालक बाळा शिरसाट यांनी उपस्थितांच्या अल्पोपहाराची सोय केली.
फोटोओळी – गुणवंत विद्यार्थी सत्कार व पारितोषिक समारंभ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी दिपप्रज्वलन केले. सोबत डॉ.गोविंद काजरेकर, अॅड.देवदत्त परूळेकर, शांताराम बांदेकर, एस.एस.काळे

शेअर करा