वेंगुर्ले :होडवडा येथे दुष्काळग्रस्त शेतीची पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केली पाहणी

शेअर करा

भातशेती, घटलेली विहिरींची पाणीपातळी व आटलेल्या बंधाऱ्यांचीही केली पाहणी;शेतकरी व ग्रामस्थांशी साधला थेट संवाद

वेंगुर्ले,दि.२७ सप्टेंबर

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आठही तालुक्यांची दुष्काळग्रस्त भाग म्हणून निवड करण्यात आली आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेती, पिण्याचे पाणी तसेच ग्रामीण भागातील जलस्रोतांवर झालेला परिणाम जाणून घेण्यासाठी राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी जिल्ह्यातील विविध भागांचा पाहणी दौरा सुरू केला आहे. जिल्ह्याचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष गावागावात जाऊन परिस्थितीची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेण्याचे काम या दौऱ्यातून केले.

वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा येथे भेट देऊन दुष्काळसदृश परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भात पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांकडून शेतीच्या नुकसानीची माहिती घेतली. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे भात शेतीवर झालेला परिणाम, पिकाला आवश्यक असलेल्या पाण्याची उपलब्धता तसेच शेतकऱ्यांसमोरील अडचणी याबाबत ना. नितेश राणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

होडावडा परिसरातील विहिरींचीही ना. नितेश राणे यांनी पाहणी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विहिरींच्या पाण्याच्या पातळीत किती घट झाली आहे, सध्या किती पाणी उपलब्ध आहे, तसेच आगामी काळात या जलस्रोतांमधून किती दिवस पाणी उपलब्ध होऊ शकते, याची माहिती त्यांनी ग्रामस्थांकडून घेतली. पाण्याच्या उपलब्धतेचा शेती तसेच दैनंदिन वापरावर झालेला परिणाम जाणून घेण्यासाठी त्यांनी स्थानिकांशी प्रत्यक्ष चर्चा केली. त्यानंतर कमी पावसामुळे पाणीसाठा घटलेल्या छोट्या बंधाऱ्याचीही ना. नितेश राणे यांनी पाहणी केली. बंधाऱ्यातील सध्याचा पाणीसाठा, पावसाअभावी झालेली घट आणि स्थानिक पातळीवर पाणीसाठा टिकविण्यासाठी करता येणाऱ्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. गावपातळीवर उपलब्ध असलेल्या जलस्रोतांचा योग्य वापर आणि पाण्याचे संवर्धन करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काही उपाययोजना करता येतील का, याचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

पाहणीदरम्यान ना. नितेश राणे यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. गेल्या वर्षी किती पाऊस झाला आणि यावर्षी पावसाच्या प्रमाणात किती फरक पडला, यामुळे शेतीवर काय परिणाम झाला, विहिरींच्या पाणीपातळीत किती घट झाली तसेच छोट्या बंधाऱ्यांमध्ये सध्या किती पाणी आहे, याची माहिती त्यांनी प्रत्यक्ष नागरिकांकडून घेतली. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

पाणी संवर्धनाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हा या पाहणी दौऱ्यामागील महत्त्वाचा उद्देश असल्याचे नितेश राणे यांनी स्पष्ट केले. केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता गावपातळीवर उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, छोटे बंधारे, विहिरी तसेच इतर पाणीसाठ्यांचा योग्य वापर करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतींनीही पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आठही तालुक्यांची दुष्काळग्रस्त भाग म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील परिस्थिती नेमकी काय आहे, याची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत हा पाहणी दौरा सुरू केला आहे. लोकांशी संवाद साधून गेल्या वर्षी आणि यावर्षी पावसाचा नेमका काय परिणाम झाला आहे, विहिरींची पाण्याची पातळी किती आहे आणि छोट्या बंधाऱ्यांमध्ये किती पाणी आहे, याची माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचा वापर करून पाण्याची परिस्थिती सुधारण्यासाठी काय करता येऊ शकते, याचाही विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आणि प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेणे, यासाठी हा दौरा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दुष्काळग्रस्त परिस्थितीत शासनाकडून मदत मिळणार असल्याचे सांगत नितेश राणे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकार म्हणून मदत करणारच आहेत. ही मदत रोख स्वरूपात असेल किंवा अन्य कोणत्या स्वरूपात असेल, त्याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कामही सरकारच्या माध्यमातून केले जाईल. सध्याच्या परिस्थितीत आपल्या लोकांना धीर देणे आणि शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास देणे, हेही या पाहणी दौऱ्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमीसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सभापती शंकर घारे, भाजप तालुका अध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब, वेंगुर्ले तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, सुचिता वजराटकर उपस्थित होते.

तसेच होडावडा सरपंच रसिका केळुसकर, उपसरपंच राजबा सावंत, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, उपसरपंच वैभवी परब, पाल सरपंच कावेरी गावडे, तुळस सरपंच रश्मी परब, विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी, कृषी विस्तार अधिकारी कोरगावकर, सावंत, मंडळ अधिकारी प्रेरणा गिरप, नेत्रा सावंत यांच्यासह किशोर परब, नितीन चव्हाण, राहुल पै, तुषार साळगांवकर, ग्रामस्थ, शेतकरी तसेच भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा