गणेशोत्सवानिमित्त भजनी मंडळांना दर्जेदार वाद्यांची सेवा; हिंदू धर्माभिमानी मंडळींकडून कुटुंबीयांसह सत्कार
वेंगुर्ला, दि.०२ सप्टेंबर(प्रथमेश गुरव)
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गेली ५२ वर्षे वेंगुर्ला शहरात येऊन भजनी मंडळांना दर्जेदार वाद्ये उपलब्ध करून देणारे सांगली जिल्ह्यातील वसंत उर्फ आबा साळुंखे आणि त्यांच्या कुटुंबियांचा वेंगुर्ल्यातील हिंदू धर्माभिमानी मंडळींच्यावतीने सत्कार करण्यात आला.
अलिकडे भजन हा प्रकार वर्षभर चालत असला तरी गणेश चतुर्थीला याचे प्रमाण जास्त असते. गणेश चतुर्थीचे वेध लागताच भजनी मंडळींची तबला, पखवाज दुरुस्ती करून घेण्याकडे लगबग वाढते. अशा भजनी मंडळांना दर्जेदार वाद्य उपलब्ध करून देण्याचे काम वसंत साळुंखे करीत आहेत. मूळचे सांगली जिल्ह्यातील आटपाटी तालुक्यातील खरसुंडी या गावातील साळुंखे हे कुटुंब गेली ५२ वर्षे वेंगुर्ला शहरात येऊन नविन वाद्ये बनविणे, जुन्या वाद्यांची दुरूस्ती करणे अशी कामे करीत आहेत. शेकडो किलोमिटरवर येऊन दर्जेदार सेवा देणाऱ्या साळुंखे कुटुंबियांची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
माणिकचौक येथील विठ्ठल मंदिरात १ सप्टेंबर रोजी झालेल्या या सत्कार समारंभाप्रसंगी प्रसन्ना देसाई, महादेव मेस्त्री, संजय तेरेखोलकर, नित्यानंद आठलेकर, भाऊ केरकर, प्रा.सुनिल नांदोस्कर, अभि वेंगुर्लेकर, अनिल नांदोस्कर, कुमार कामत, आपा धोंड, पी.के.कुबल आणि प्रथमेश गुरव आदी उपस्थित होते. प्रा.सुनिल नांदोस्कर यांनी मुलाखतीच्या माध्यमातून श्री.साळुंखे यांची वेंगुर्ल्यात येण्याबाबतची पार्श्वभूमी जाणून घेतली.
यावेळी बोलताना आबा साळुंखे म्हणाले की, वाद्ये दुरूस्ती करणारा घडशी समाज म्हणून आमची ओळख आहे. सुरूवातीला आपण मालवण येथे वाद्य दुरुस्तीची कामे करायचो. तेथे वेंगुर्ल्याचे ज्योतिषी भाऊ आंबार्डेकर यांची ओळख झाली. त्यांनीच आपल्याला वेंगुर्ल्यात आणले. परंतु, इथे आल्यावर हा व्यवसाय करण्यासाठी जागा आवश्यक होती. जागेची असलेली गरज सहदेव केळजी यांनी पूर्ण केली. आज केळजी यांची चौथी पिढी आम्हाल नि:स्वार्थी मनाने सहकार्य करीत आहेत. पूर्वीपेक्षा आता वाद्य कला शिकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साहजिक वाद्यांच्या मागणीतही वाढ झाली असून वादकांच्या मागणीनुसार वाद्य बनवून देणे आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यात आम्ही यशस्वी ठरत आहोत. वर्षातून दोन ते अडीच महिनेच आम्ही याठिकाणी असतो. इथल्या लोकांमध्ये आपलेपणा आहे. त्यामुळेच आमचा हा प्रवास आजपर्यंत सुरू असल्याचे साळुंखे यांनी आवर्जून सांगितले.
दरम्यान, महादेव मेस्त्री यांनीही साळुंखे परिवाराचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला.