Vengurla News : वेंगुर्ला नगरपरिषदेची भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी मोहीम!

शेअर करा

दोन टप्प्यांत २७६ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण; नगरपरिषदेच्या प्रशासनाची माहिती!

वेंगुर्ला ,दि.२८ ऑक्टोंबर (प्रथमेश गुरव)-

शहरातील भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने प्रभावी पाऊल उचलले आहे. दरम्यान, दोन टप्प्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत सुमारे २७६ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजकरण व लसीकरण करण्यात आल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली.
वेंगुर्ला शहरात गेले काही महिने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली होती. नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे तसेच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत नगराध्यक्ष दिलीप गिरप आणि मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथील सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन या संस्थेमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली होती. जानेवारी महिन्यात राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात एकूण १४३ तर दि.२० ते २७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेच्या दुस­ऱ्या टप्प्यात एकूण १३३ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले. कुत्र्यांच्या हल्ल्यांचा धोका कमी करणे, त्यांच्या संख्येवर दीर्घकालीन नियंत्रण मिळविणे तसेच रेबीजसारख्या गंभीर आजारांचा प्रसार रोखणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता. उर्वरित भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यासाठी येत्या काही महिन्यांत पुन्हा मोहीम राबविण्यात येणार आहे.

शेअर करा