वेंगुर्ला : वारंवार वीज पुरवठा खंडित प्रकरणी वेंगुर्ल्यात ठिय्या

शेअर करा

वेंगुर्ला, दि. ६ जुलै
तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतप्त नागरिकांनी आज सोमवारी वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटनेच्या नेतृत्वाखाली विद्युत वितरण विभागाच्या वेंगुर्ला उपविभागीय कार्यालयाला धकड दिली. यावेळी कार्यालयासमोर संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी सिंधुदुर्ग अधीक्षक अभियंता अभिमन्यू राग यांनी काही मागण्या मान्य करण्याचे लेखी निवेदन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.


गेले काही दिवस वेंगुर्ला तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत
असल्याने संतप्त वीज ग्राहकांनी वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष तथा जि.प.सदस्य संजय गावडे यांच्या नेतृत्वाखाली विद्युत वितरण उपविभागीय कार्यालय वेंगुर्ला येथे धडक देत ठिय्या आंदोलन करत स्मार्ट मीटरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय गावडे यांच्यासहित जिल्हाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर, जि.प. सदस्य विजय नाईक, सुदन कवठणकर, सावंतवाडी पं.स.सदस्य उदय परिपत्ये, पं.स.माजी सभापती यशवंत परब, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, उपसरपंच चंदन हाडकी, ग्रा.पं. सदस्य जगन बांदेकर, पांडुरंग नाईक, रश्मी डीचोलकर, वीज ग्राहक संघटनेचे जयराम वायंगणकर, किरण खानोलकर, वाल्मिक कुबल, राजेश तेरेखोलकर साक्षी चमणकर, कोमल सरमळकर, दीपा पेडणेकर, शर्वरी गावडे, पल्लवी गावडे, दादा पेडणेकर, बाळू साळगावकर, भास्कर गावडे, प्रवीण पालव, विकी केरकर, वैभव फटजी, नम्रता कुर्ले, संजय भाटकर, शिवराम आरोलकर यांच्यासहित सुमारे २०० ग्रामस्थ उपस्थित होते.
स्मार्ट मीटरमूळे ग्राहकांना आलेली भरमसाठ आलेली विज बिल, स्मार्ट मीटरची सक्ती, वायरमनची कमतरता, गेले ५ दिवस वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा व यामुळे नागरिकांचे होणारे नुकसान यावर उपस्थितीतांकडुन विद्युत वितरण विभागाचे जिल्हा अधिक्षक अभियंता अभिमन्यू राग, कुडाळ विभागीय कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, वेंगुर्ला उपकार्यकारी अभियंता रोहित सेवेकरी यांना जाब विचारण्यात आला.


“आम्हाला स्मार्ट मीटर नको तर स्मार्ट वीज पुरवठा द्या. सिंधुदुर्ग – दोडामार्ग येथून गोव्याला वीज पुरवठा केला जातो त्यांचे दर अतिशय कमी असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांना सुद्धा गोवा राज्याच्या धर्तीवर युनिटचे दर लावून वीज आकारणी करा. चांगल्या दर्जाचा, चांगल्या व्हॉल्टेजचा वीजपुरवठा करा. वीज वितरण वाहिन्यांवर आलेली झाडी कटिंग करा आदी मागण्या यावेळी नागरिकांच्य वतीने संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय गावडे यांनी अधिकाऱ्यांकडे केल्या. तर ग्राहकांना आलेल्या भरमसाट वीज बिलांचा विचार करता स्मार्ट मीटर विरोधात कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
एक लोकप्रतिनिधी वारंवार विजेच्या समस्याबद्दल फोन करत असताना फोन उचलले जात नाहीत या मुद्यावरून जिल्हा परिषद सुदन कवठणकर यांनी तीव्र शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले. मागील ४ ते ५ दिवस तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. लोक अंधारात आहेत. यामुळे दर तासाला किमान १०० व कमाल १ हजार रु प्रमाणे नुकसान भरपाई मिळू शकते. यासाठी सर्व कायदेशीर व तांत्रिक मार्गदर्शन वीज ग्राहक संघटना करेल. आणि येणाऱ्या ३ महिन्यात या वीज ग्राहकांना ५ कोटी नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगत ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे त्यांनी विद्युत वितरणकडे तक्रार अर्ज द्यावेत असे आवाहन केले.


येत्या १५ दिवसात विद्युत वहिनी दुरुस्तीची कामे, झाडे तोडणे, आवश्यकत्या ठिकाणी पोल बदलणे कामे करण्यात येतील. ग्राहकांना वीज बिले वेळेत देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळण्याबाबत आवश्यक माहिती ग्राहकांना देण्यात येईल. तालुक्यात स्मार्ट मीटरबाबत तक्रारीचे निवारण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल व स्मार्ट मीटर बद्दलण्याबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. दर महिन्याला ऊर्जामित्र बैठक घेण्यात येईल. सर्व अधिकाऱ्यांना ग्राहकांचे फोन उचलण्याबाबत सक्त सूचना देण्यात येतील. असे लेखी आश्वासन विद्युत वितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राग यावेळी दिले.

शेअर करा