वेंगुर्ले : तुळस येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये सोलर सिस्टिमचे उद्घाटन

शेअर करा

अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांच्या विशेष प्रयत्नांना यश; ₹३.५० लाखांची सौरऊर्जा यंत्रणा विद्यालयाला उपलब्ध

वेंगुर्ले,दि.१२ सप्टेंबर

रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल, तुळस येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व पायाभूत सुविधांना बळकटी देणाऱ्या ₹३ लाख ५० हजार रुपये किमतीच्या सोलर सिस्टिमचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री सौ. शिल्पा तुळसकर यांच्या विशेष प्रयत्नातून तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्थेच्या माध्यमातून ही सोलर सिस्टिम विद्यालयाला उपलब्ध करून देण्यात आली.

या सोलर सिस्टिमचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्या तथा शाळा समिती सदस्या सौ. सुजाता पडवळ यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्थेचे अध्यक्ष श्री. विष्णू परब, तुळस गावचे उद्योजक श्री. सुधीर दादा झांट्ये, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व माजी सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. डिसोझा सर, स्थानिक प्रतिनिधी प्रमुख श्री. प्रकाश परब, संस्थेचे सेक्रेटरी श्री. वासुदेव नाईक, सदस्य श्री. मधुकर परब, श्री. भगीरथ माळकर, श्रीमंत पार्वती देवी वाचनालयाचे अध्यक्ष श्री. विवेकानंद परब, शाळा समिती सदस्य श्री. पराग सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संदीप पेडणेकर, मुख्याध्यापक श्री. कोल्हे सर, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

सोलर सिस्टिमच्या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष श्री. विष्णू परब यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर उद्योजक श्री. सुधीर दादा झांट्ये यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले आणि सौ. सुजाता पडवळ यांच्या हस्ते फित कापून सोलर सिस्टिमचे लोकार्पण करण्यात आले.

विद्यालयाला ही सौरऊर्जा यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या अभिनेत्री सौ. शिल्पा तुळसकर तसेच या उपक्रमाच्या पूर्ततेसाठी विशेष मेहनत घेणारे तुळस येथील उद्योजक श्री. सुधीर दादा झांट्ये यांचे यावेळी उपस्थित मान्यवरांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे विद्यालयाच्या वीजखर्चात बचत होण्याबरोबरच स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना अक्षय ऊर्जा, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. विद्यालयातील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले, तर विद्यार्थ्यांनी संगीताची साथ दिली. उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, आभारपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे माजी सहाय्यक विभागीय अधिकारी तथा विद्यालयाचे मार्गदर्शक श्री. डिसोझा सर यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला. तसेच यावर्षी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांसह क्रीडा शिक्षक श्री. घोडे पाटील सर यांचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. कोल्हे सर यांनी केले. यावेळी बोलताना सौ. सुजाता पडवळ यांनी विद्यालयातील शैक्षणिक व पायाभूत सुविधांना चालना देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सौरऊर्जेसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांचा विद्यार्थ्यांसह विद्यालयाला दीर्घकाळ लाभ होणार असून, विद्यालयाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध सुविधा व उपक्रमांना आपल्या परीने सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप तुळसकर सर यांनी केले, तर सौ. धनश्री तुळसकर मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शेअर करा