सावंतवाडी,दि.२४ सप्टेंबर
लोकमान्य प्रा. मधु दंडवते रेल्वे टर्मिनस सावंतवाडी येथील नवीन इमारतीचे काम कोकण रेल्वेने सुरू केले होते. मात्र, ही इमारत उभी राहिल्यास भविष्यात पाचव्या रुळाच्या उभारणीसाठी आणि फलाटासाठी (प्लॅटफॉर्म) पुरेशी जागा शिल्लक राहणार नव्हती. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने हा विषय निदर्शनास आणून दिल्यानंतर कोकण रेल्वेचे सीएमडी संतोष कुमार झा यांची भेट घेऊन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती सध्या सुरू असलेल्या कामाला १५ दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
आमदार केसरकर यांनी सांगितले की, पाचव्या क्रमांकाचा प्लॅटफॉर्म आणि टुरिस्ट फॅसिलिटीचे (पर्यटन सुविधा) काम एकाच वेळी हाती घेण्यात यावे, असे बैठकीत सुचवण्यात आले असून त्याला मान्यता देण्यात आली आहे. लवकरच रेल्वेची टीम या जागेची पाहणी करणार आहे. एक चांगले टर्मिनस आणि पाचवा प्लॅटफॉर्म अस्तित्वात आल्यानंतर सावंतवाडी स्थानकात गाड्या थांबण्याचे प्रमाण वाढेल.
फलाट क्रमांक ४ वर पर्यटन सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न होता; परंतु कॉलमचे काम करताना केबल तुटून रेल्वे सेवा ठप्प होण्याचा धोका होता. त्यामुळे हा निधी शेजारील जमिनीसाठी राखून ठेवला असून तो सध्या अखर्चित आहे.
तिलारी योजनेतून रेल्वे व चीपी विमानतळापर्यंत पाणी:
रेल्वे स्थानकात गाड्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नाबार्डकडून विशेष योजना मंजूर करून घेण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. तिलारीच्या या योजनेतून मळगाव, न्हावेली, निरवडे आणि वेत्ये या गावांना पाणीपुरवठा केला जाईल. तसेच हे पाणी पुढे चीपी विमानतळापर्यंत पोहोचवले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रेडी बंदर आणि रेल्वे यार्ड विकास:
रेडी बंदराचा विकास होत असल्याने सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर यार्ड तयार करून इतर आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाने सकारात्मक तयारी दर्शवली आहे. पीपीपी (PPP) तत्त्वावर आधारित काम केल्यास गुंतवणूकदार पुढे येण्यास तयार आहेत, ज्यामुळे रेल्वे स्थानकावर अतिरिक्त सायडिंग उपलब्ध होईल. या टर्मिनसच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येकी ५० टक्के गुंतवणुकीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दिल्लीत रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार:
फ्लायओव्हरच्या प्रश्नावर मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे बैठकीची मागणी केली असून, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनाही या बैठकीस उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येणार आहे. सावंतवाडी स्थानकात ‘वंदे भारत’ रेल्वेसह अन्य महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा आणि टर्मिनसचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी लवकरच दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.
आमदार केसरकर म्हणाले,नवी मुंबई येथे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोषकुमार झा यांच्यासोबत सावंतवाडी टर्मिनसच्या ५ व्या प्लॅटफॉर्मबाबत झालेल्या चर्चेतील बैठकीस उपस्थित असलेले अधिकारी श्री. सुनील गुप्ता,संचालक (ऑपरेशन्स आणि कमर्शियल),श्री. एल. प्रकाश
प्रिन्सिपल चीफ इंजिनिअर (मुख्य अभियंता)
श्री. डी. जी. बोंडे,उपमुख्य कमर्शियल मॅनेजर/गुड्स आदी होते.